काबुल – गेल्या वर्षी ठरलेल्या मुदतीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य कायम ठेवून अमेरिकेने आपल्याबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. अमेरिकेच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी तालिबानने दिली. या धमकीला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानातील दोन लष्करी तळांवर दहशतवाद्यांनी हल्ले चढविले. यापैकी गझनी प्रांतातील लष्करी तळाचा तालिबानने ताबा घेतला तर कंदाहर प्रांतातील हवाईतळाचे विशेष नुकसान झाले नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तर अफगाणी लष्कराने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत ८१ तालिबानी ठार झाल्याचे जाहीर केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या घोषणेनुसार, शनिवारपासून अमेरिका आणि नाटोची अफगाणिस्तानातून सैन्यमाघार सुरू झाली. तरीही अमेरिकेने वर्षभरापूर्वी कतारची राजधानी दोहा येथे केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या धमकीत तालिबानचे नेतृत्व यापुढील प्रत्युत्तराचा निर्णय घेईल, असे धमकावले आहे. ‘अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, मूल्ये आणि हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी लवकरच कारवाई केली जाईल’, असे मुजाहिद म्हणाला.
यानंतर पुढच्या काही तासातच अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील लष्कराच्या तळावर तालिबानने हल्ला चढविला. या तळावर अफगाणी लष्कराचा ताबा होता. पण शनिवारी उशीरा तालिबानने हल्ला चढवून या तळाचा ताबा घेतला. या हल्ल्यात अफगाणी जवानांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तसेच तालिबानने काही जवानांना ओलीस धरल्याची माहिती समोर येत आहे. तर रविवारी दुपारी कंदहार प्रांतातील हवाईतळावरही हल्ले झाले.
अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कर्नल सनी लेगेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कंदहार हवाईतळावर रॉकेट हल्ले चढविले. पण यामध्ये हवाईतळाचे अजिबात नुकसान झाले नसल्याचे कर्नल लेगेट यांनी म्हटले आहे. या हल्ल्यासाठी तालिबानला जबाबदार धरण्याचे अमेरिकी लष्करी अधिकार्यांनी टाळले. तर तालिबानने देखील अमेरिकेच्या नियंत्रणात असलेल्या हवाईतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण अमेरिकेच्या या माघारीनंतर तालिबानने पुन्हा हिंसाचार सुरू केला तर ते मुर्खपणाचे आणि अफगाणींसाठी क्लेशदायक ठरेल, असा इशारा कर्नल लेगेट यांनी दिला.
दरम्यान, अमेरिका व नाटो लष्कराची सैन्यमाघार सुरू असताना, अफगाणी लष्कराने तालिबानविरोधी कारवाईचा वेग कायम राखला आहे. गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत ८१ तालिबानींना ठार केले तर ५२ जण जखमी झाले. कुनार, गझनी, बादघीस, बलख, कंदहार, हेल्मंड, फरयाब आणि तखार या भागात अफगाणी लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये तालिबानकडून हस्तगत केलेली आयईडी स्फोटके नष्ट केली. तसेच अमेरिकेने अफगाणी लष्कर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान तसेच अल कायदा अफगाणिस्तानचे पुन्हा नियंत्रण मिळवतील, असा इशारा अमेरिकेचे लष्करी अधिकारीच देत आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी देखील या सैन्यमाघारीवर टीका करून पुन्हा अफगाणिस्तानात तैनाती करण्याची वेळ ओढावू शकते, असा इशारा दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |