जेरूसलेम/गाझा- गेल्या चोवीस तासात इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये भडकलेल्या संघर्षात २७ जण ठार झाले. यामध्ये दोन इस्रायली महिलांचा समावेश आहे. सोमवारच्या रात्रीपासून गाझातील हमास आणि ‘इस्लामिक जिहाद’ने इस्रायलवर ४०० हून अधिक रॉकेट हल्ले चढविले. तर इस्रायलने हमासच्या १३० ठिकाणांना लक्ष्य केले. रॉकेट हल्ले चढविणार्या हमासला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायलच्या लष्कराने हा संघर्ष बराच काळ चालेल, असे सांगून गाझाच्या सीमेजवळ रणगाड्यांची तैनाती वाढविली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गाझातून इस्रायलच्या सीमाभागात रॉकेट तसेच बलूनबॉम्बचे हल्ले सुरू झाले होते. पण गेल्या चोवीस तासात या हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार संध्याकाळपर्यंत इस्रायलच्या सीमाभागात किमान ४०० रॉकेट हल्ले चढविल्याचा दावा हमास व इस्लामिक जिहाद या संघटनांनी केला आहे. इस्रायलने या दोन्ही संघटनांना दहशतवादी घोषित केले आहे.
हमासने केलेल्या एका दाव्यात, पाच मिनिटांमध्ये इस्रायलवर १३७ रॉकेट्स डागल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या अश्खेलॉन शहरावर मोठ्या संख्येने रॉकेट हल्ले झाले असून याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज् समोर येत आहेत. याच शहरावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये दोन महिलांचा बळी गेला तर २७ इस्रायली नागरिक जखमी झाल्याची बातमी स्थानिक माध्यमे देत आहेत. गाझातून होणार्या या रॉकेट हल्ल्यांना इस्रायली लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.
इस्रायलने गाझातील हमासच्या १३० ठिकाणांना लक्ष्य केल्याचे जाहीर केले. यामध्ये हमासकडून वापरले जाणारी भुयारीमार्ग, शस्त्रास्त्रांची कोठारे नष्ट केल्याची माहिती माध्यमांमधून दिली जात आहे. तर इस्रायलच्या या कारवाईत २५ पॅलेस्टिनी ठार झाले असून यात नऊ मुलांचा समावेश असल्याची तक्रार हमास करीत आहे. याशिवाय १०६ पॅलेस्टिनी जखमी झाल्याचे गाझातील हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. तर आपल्या लष्कराच्या कारवाईत १५ दहशतवादी ठार झाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. यामध्ये इस्लामिक जिहादच्या तीन कमांडर्सचाही समावेश असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. चोवीस तासांच्या या सघर्षानंतर हमासने इस्रायलकडे संघर्षबंदीची मागणी केल्याची माहिती इस्रायली वृत्तवाहिनीने दिली. हमासने अरब मध्यस्थांकडून इस्रायलला हा संघर्षबंदीचा प्रस्ताव दिल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पण इस्रायलने हमासची ही मागणी धुडकावली आहे. दोन दिवसांपूर्वी इस्रायलनेच हमासला संयम दाखविण्याचे आवाहन केले होते. इजिप्तच्या माध्यमातून इस्रायलने हमासला हा संदेश पोहोचविला होता. पण हमासने हा संदेश धुडकावून इस्रायलवरील हल्ले तीव्र केले होते.
आत्ता इस्रायलने देखील हमासच्या या रॉकेट हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. ‘जेरूसलेम, गाझा आणि इतर आघाड्यांवर इस्रायलला लक्ष्य केले जात आहे, इस्रायलवर हल्ले चढविले जात आहेत. गाझातील दहशतवादी संघटनांनी जेरूसलेम डेच्या दिवशी हल्ले चढवून रेड लाईन पार केली आहे. या चुकीला इस्रायल तितकेच कठोर उत्तर देईल. आपली सीमारेषा, राजधानी, जनता आणि सैनिकांवरील हल्ले इस्रायल कदापि सहन करणार नाही. या हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल’, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बजावले आहे.
दरम्यान, गाझापट्टीतून रॉकेट हल्ले सुरू असताना, जेरूसलेममध्ये इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनींमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामधर्मिय देशांच्या संघटनेने जेरूसलेममधील संघर्षावर टीका केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |