वॉशिंग्टन – ‘मागच्या वेळी चीनमध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी चीन उदयाला येत असलेला देश होता. पण यावेळी चीनमध्ये होणारे विंटर ऑलिंपिक व्यवस्थितपणे पार पडले, तर त्याचा वापर चीन आपण महासत्ता बनलो आहोत, हे दाखविण्यासाठी करील. यात यश मिळाले की चीन तैवानचा घास गिळल्यावाचून राहणार नाही, हे माझे शब्द लक्षात ठेवा. एकदा का चीनने तैवानचा ताबा घेतला, त्याचा प्रभाव त्या क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. त्यानंतर चीन इतर देशांचे भूभागही गिळंकृत करील’, असा थरकाप उडविणारा इशारा निक्की हॅले यांनी दिला आहे.
2022 साली चीनमध्ये ‘विंटर ऑलिंपिक’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावर अमेरिकेने बहिष्कार टाकावा अशी मागणी निक्की हॅले यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत व सध्या अमेरिकेच्या राजकारणातील प्रभावी नेत्या म्हणून निक्की हॅले सक्रीय आहेत. ‘स्टँड फॉर अमेरिका’ या 2019 साली त्यांनीच सुरू केलेल्या गटामार्फत अमेरिकेच्या धोरणांची चर्चा केली जाते. ‘स्टँड फॉर अमेरिका’ला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. 2025 सालच्या अमेरिकेतील निवडणुकीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निक्की हॅले उभ्या राहतील, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत हॅले यांनी चीनबाबत दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.
चीन आपल्या लष्कराची उभारणी करीत आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. चीनकडे अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत आणि आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी चीन झपाट्याने पावले उचलत आहे. त्याचवेळी अमेरिका मात्र आपल्या संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाकडे फारसे लक्ष द्यायला तयार नाही. दुसर्या बाजूला चीन बुद्धिसंपदा कायद्याचे उल्लंघन करून अमेरिकेच्या बुद्धिसंपदेवर डल्ला मारत आहे. उघूरवंशिय इस्लामधर्मियांचा अनन्वित अत्याचार करणारा चीन त्यांचा वंशसंहार घडवून आणत आहे. आणखी एक वंशसंहार आपल्याला शांतपणे खपून घेता येणार नाही, अशा शब्दात निक्की हॅले यांनी चीनचा धोका अधोरेखित केला.
संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत या नात्याने आपण काम करीत असताना चीनचे प्रतिनिधी शांतपणे काम करीत असल्याचे आपण पाहिले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हाती चीनचे सर्वाधिकार केंद्रीत झाले आणि परिस्थिती बदलली. राष्ट्रसंघाच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रमुख पदांवर आपली माणसे घुसविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या. राष्ट्रसंघात आपल्या बाजूने मतदान न करणार्या देशांना धमक्या देण्यापर्यंत चीनची मजल गेली, याची नोंद हॅले यांनी केली.
म्हणूनच बुद्धिसंपदा कायद्याचे उल्लंघन करून अमेरिकेचे नुकसान घडवून आणणार्या चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात निर्बंध टाकले होते. आत्ताच्या प्रशासनाने त्याचा पाठपुरावा केला तर ते अमेरिकेच्या भल्याचे ठरेल. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, आपल्या देशात उद्योग करणार्या कंपन्यांना चीनच्या लष्कराबरोबर सहकार्य करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्या अमेरिकन कंपन्याही यातून सुटलेल्या नाहीत. अमेरिकेत कोरोनाची लाट आलेली असताना, चीनमध्ये व्यवसाय करणार्या ‘थ्री एम’?आणि ‘हनीवेल’ या अमेरिकन कंपन्यांनी पीपीई किट्स तयार केले होते. पण चीनने हे पीपीई किट्स व इतर साहित्य अमेरिकेला मिळू दिले नाही. त्यांच्या पीपीई किट्सची प्रचंड प्रमाणात चीननेच खरेदी केली. आपल्या मागण्या मान्य करणार्या देशांनाच हे पीपीई किट्स पुरविण्याचा निर्णय चीनने घेतला होता.
अशारितीने चीन अमेरिकेसह सर्वांना वेठीस धरत आहे. चीनच्या या कारवाया आपली रात्रीची झोप उडवित आहे, असे सांगून हॅले यांनी त्याचे गांभीर्य अधोरेखित केले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि आर्थिक हितसंबंधांना चीनपासून असलेला धोका भयंकर स्वरुप धारण करू लागला आहे, याकडे लक्ष वेधून हॅले यांनी अमेरिकेला दिलेला इशारा इतर देशांच्या गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. तैवान, जपान व ऑस्ट्रेलियाचे नेतेही याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |