वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या सुरक्षेला चीनपासून आधीही धोका होता आणि आजही आहे. पण आत्ताच्या काळात हा धोका वाढत चालला असून याचा बंदोबस्त करणे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब ठरते. म्हणून सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी आणि मित्रदेशांबरोबर अधिक दृढ मैत्री प्रस्थापित करण्यावर अमेरिकेने लक्ष केंद्रित करणे आता खरोखरच महत्त्वाचे बनले आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी इंडो-पॅसिफिक देशांचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर या क्षेत्रातील चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिकेने ‘टास्क फोर्स’ उभारल्याची माहिती संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिली.
इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला चीनच्या आक्रमक लष्करी हालचालींपासून धोका असल्याचा उल्लेख सातत्याने होऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रुसेल्स येथे नाटोच्या बैठकीत पहिल्यांदाच उघडपणे चीनच्या या धोक्यावर चर्चा झाली. तर साऊथ चायना सीमधील घाडमोडी या क्षेत्रातील देशांबरोबरच बाहेरच्या देशांचेही लक्ष वेधून घेत आहेत, अशा सूचक शब्दात भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी असियान देशांच्या बैठकीत चीनच्या वर्चस्ववादी कारवायांवर बोट ठेवले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन आणि इंडो-पॅसिफिक कमांडच्या प्रमुखांनी चीनच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सहकार्याची भूमिका मांडली होती. अमेरिकेचे लष्करी अधिकारी चीनबाबत कठोर भूमिका स्वीकारीत असताना बायडेन प्रशासन मात्र मवाळ धोरणे राबवित असल्याचे आरोप सुरू होते. अशावेळी सिनेटच्या ‘ऍप्रोप्रिएशन्स कमिटी’समोर बोलताना, चीनच्या धोक्याचा बंदोबस्त करणे ही नेहमीच आपल्यासाठी प्राथमिकता होती, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी मान्य केले.
‘चीनच्या या धोक्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी, परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यासह पहिल्या परदेश दौर्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांना भेट दिली’, असे सांगून ऑस्टिन जपान, दक्षिण कोरिया या अमेरिकेच्या सहकारी आणि त्यानंतर भारत या अमेरिकेच्या भागीदार देशाला दिलेल्या भेटींचा उल्लेख केला. तर दोन दिवसांपूर्वी, असियानच्या बैठकीत स्वतंत्र आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आग्नेय आशियाई देशांबरोबरचे सहकार्य वाढविण्यावर भर दिल्याचे ऑस्टिन म्हणाले.
त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या महत्त्वाकांक्षा लष्करी हालचाली रोखण्यासाठी या क्षेत्रात कायमस्वरुपी ‘नेव्हल टास्क फोर्स’ उभारणार असल्याचे ऑस्टिन म्हणाले. या टास्क फोर्सचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सिनेटच्या समितीसमोर दिली. यासाठी, ‘अमेरिकेला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी आणि मित्रदेशांबरोबर अधिक दृढ मैत्री प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करणे आता खरोखरच महत्त्वाचे बनले आहे. चीनच्या या धोक्याविरोधात अमेरिकेला अत्याधुनिक लष्करी सामर्थ्य विकसित करावे लागेल. त्यासाठी पेंटॅगॉनने प्रस्तावित केलेल्या बजेटला मंजूरी द्यावी’, असे आवाहन ऑस्टिन यांनी केले.
दरम्यान, चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अमेरिकी नौदल चीनविरोधात स्वतंत्र पथक उभारत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण या बातमीला पेंटॅगॉनकडून दुजोरा मिळालेला नाही.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |