जेरूसलेम/वॉशिंग्टन – ‘40 वर्षांपूर्वी इराकमधील खूनी आणि धोकादायक राजवटीसारखाच, आजचा इराण देखील इस्रायलच्या विरोधात दहशतवादी कारवायांद्वारे आपले साम्राज्य उभारीत आहे. इस्रायलला धमकावून संपूर्ण क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी इराण अणुबॉम्बची निर्मिती करू पाहत आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास इस्रायल 1981 सालाप्रमाणे पुन्हा कारवाई करू शकतो’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला.
गुरुवारी इस्रायली हवाईदलाचा समारोह पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराणबाबतची भूमिका मांडली. ‘इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अमेरिकन सहकार्यांच्या संपर्कात आहे. आवश्यकता असल्यास, इस्रायल आपल्या डावपेचांचा वापर करून हा धोका संपवून टाकेल. हे सारे इस्रायल व्यावसायिकपणे आणि जबाबदार मुत्सद्देगिरीने पार पाडेल’, असे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी घोषित केले.
यासाठी संरक्षणमंत्री गांत्झ यांनी 1981 साली इस्रायली हवाईदलाने ‘ऑपरेशन बेबिलॉन’ अंतर्गत इराकच्या ओसिराक अणुप्रकल्पावर चढविलेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. इराकमधील सद्दाम हुसेनच्या राजवटीप्रमाणे इराण देखील इस्रायलला धमकावण्यासाठी अणुबॉम्बची निर्मिती करीत आहे. म्हणूनच आवश्यकता निर्माण झाल्यास, इस्रायल 1981 सालाप्रमाणे आत्ताही इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवू शकतो, असे गांत्झ यांनी बजावले. चार दिवसांपूर्वी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या लष्कराला इराणविरोधी मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते.
गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट देखील उपस्थित होते. त्यांनी देखील इराणवरील हल्ल्याचे संकेत दिले. ‘इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोकादायक असलेल्या शत्रूपासून इस्रायलचा बचाव करणे, हे प्रत्येक इस्रायली पंतप्रधानांसाठी पवित्र जबाबदारी असते. याआधी इराकपासून इस्रायलला धोका होता, तर आज इराणपासून तसाच धोका आहे’, अशा शब्दात पंतप्रधान बेनेट यांनी इराणवरील कारवाईचे संकेत दिले. त्याचबरोबर इराणबरोबरील अणुकरारासाठी हालचाली तीव्र करणार्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासह आपली चर्चा सुरू असल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली.
इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी गेले दोन दिवस अमेरिकेच्या दौर्यावर होते. या दौर्यात लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व पेंटॅगॉन येथे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क माय्ली तसेच सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांची भेट घेतली. अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारात पुन्हा सामील होणे अतिशय धोकादायक ठरेल, असा इशारा यावेळी लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी दिला.
दरम्यान, इराणच्या कराज प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्याच्या घटनेला चोवीस तास उलटले आहेत. पण अजूनही या हल्ल्याचे तपशील उघड झालेले नाहीत. इराणची राजवट व माध्यमे याची माहिती द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत या हल्ल्याच्या दुसर्याच दिवशी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराकच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्याची आठवण करून दिली व इराणवर असाच हल्ला होऊ शकतो याची जाणीव करून दिली, ही सूचक बाब ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |