‘मून वॉरफेअर’साठी अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ने सज्ज रहायला हवे – ‘स्पेस व्हेईकल्स डायरेक्टरेट’चा अहवाल

वॉशिंग्टन – पृथ्वी, चंद्र व त्यांच्यामधील कक्षा ही अंतराळातील युद्धभूमी ठरु शकते, याची जाणीव ठेऊन ‘युएस स्पेस फोर्स’ने ‘मून वॉरफेअर’साठी सज्ज रहायला हवे, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्पेस व्हेईकल डायरेक्टरेट’ने दिला आहे. गेल्या काही वर्षात अनेक देश तसेच खाजगी कंपन्यांनी चंद्र व भोवतालच्या कक्षेत मोहिमा हाती घेतल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेला आपले अंतराळातील हितसंबंध जपण्यासाठी युद्धसज्जता ठेवावी लागेल, असे अहवालात बजावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच चीन व रशियाने चंद्रावर तळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर नव्या अहवालातील इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘स्पेस व्हेईकल डायरेक्टरेट’ ही यंत्रणा अमेरिकी हवाईदलाच्या ‘एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरी’चा भाग आहे. या यंत्रणेकडे अंतराळातील तंत्रज्ञान व क्षमतांचे संशोधन तसेच विकासाची जबाबदारी आहे. ‘स्पेस व्हेईकल डायरेक्टरेट’ने नुकताच ‘अ प्राईमर ऑन सिस्ल्युनर स्पेस ’ नावाचा अहवाल सादर केला असून त्यात पृथ्वी, चंद्र व त्याच्या कक्षेशी निगडित विविध मोहिमा तसेच तंत्रज्ञान व संशोधनाची माहिती दिली आहे. अहवालाच्या सुरुवातीला ‘नासा’ व अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’मध्ये झालेल्या एका सामंजस्य कराराचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात चंद्र व भोवतालची कक्षा युद्धभूमी ठरु शकते, असे बजावण्यात आले आहे.

‘पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेपलिकडे अंतराळयान चालविणे हे एक मोठे आव्हान ठरते. येत्या काही वर्षात चंद्र व त्यापलिकडे व्यावसायिक हितसंबंध विकसित होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता त्याच्याशी निगडीत योग्य माहिती असणे तसेच सुरक्षेबाबत सज्ज असणे आवश्यक ठरते’, अशा शब्दात ‘स्पेस व्हेईकल डायरेक्टरेट’चे संचालक कर्नल एरिक फेल्ट यांनी अहवालाचे महत्त्व स्पष्ट केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत 2019 साली ‘स्पेस फोर्स’ची स्थापना झाली होती. त्यावेळी ‘स्पेस फोर्स’चे उद्दिष्ट फक्त अमेरिकेचे अंतराळातील अस्तित्व राखणे हे नसून या क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व निर्माण करणे ही त्याची जबाबदारी असेल, असे ट्रम्प यांनी बजावले होते. गेल्या वर्षभरात ‘स्पेस फोर्स’कडून त्यासाठी मोठी पावले टाकण्यात येत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘स्पेस फोर्स’चे प्रमुख जनरल जे रेमंड यांनी आपले दल ‘डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम’वर काम करीत असल्याची माहिती दिली होती. त्यापूर्वी अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ने ‘ओडेसी’ हा ‘सर्व्हिलन्स सॅटेलाईट’ अंतराळात प्रक्षेपित केल्याचेही समोर आले होते. ‘स्पेस फोर्स’च्या युनिटकडून स्वतंत्र उपग्रह अंतराळात सोडण्याची ही पहिलीच घटना ठरली होती.

रशिया व चीनकडून अंतराळात वेगवान हालचाली सुरू आहेत. दोन्ही देशांनी नुकतीच चंद्रावर तळ उभारण्याची घोषणा केली आहे. चीनने अंतराळस्थानकाचीही निर्मिती सुरू केली असून मंगळावरही मोहिमा आखल्या आहेत. रशिया व चीनने अंतराळातील उपग्रह उडविता येतील, अशी क्षेपणास्त्रेही विकसित केली आहेत. हे दोन्ही देश अंतराळाचे लष्करीकरण करीत असून चीनसारख्या देशाच्या महत्त्वाकांक्षा अंतराळातील युद्धाला निमंत्रण देणार्‍या ठरतील, असे इशारे अमेरिकी यंत्रणा व अधिकार्‍यांनी यापूर्वीच दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info