वॉशिंग्टन/बीजिंग – प्रेमळ व विनम्र देश अशी चीनची प्रतिमा तयार करा, असा संदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे नेते व अधिकार्यांना दिल्याचे समोर आले होते. जिनपिंग यांचा संदेश नेते व अधिकार्यांनी मनावर घेतला असला तरी जगातील इतर देशांनी मात्र त्याला फारशी किंमत दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा अद्यापही नकारात्मक व डागाळलेलीच असल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालांमधून समोर आले आहे. कम्युनिस्ट पार्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनची राजवट आपलीच पाठ थोपटून घेत असताना समोर आलेला हा अहवाल लक्षवेधी ठरतो.
अमेरिका, युरोप व आशिया पॅसिफिक क्षेत्रातील १७ प्रमुख देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून चीनची नकारात्मक प्रतिमा प्रकर्षाने समोर आली आहे. अमेरिका व कॅनडासह युरोपातील नऊ देश आणि आशिया पॅसिफिकमधील सहा देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जपानमध्ये तब्बल ८८ टक्के नागरिकांनी चीनबद्दल नकारात्मक मत व्यक्त केली असून युरोपमधील स्वीडनच्या ८० टक्के नागरिकांनी चीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.