टोकिओ/बीजिंग – येत्या काळात तैवानवर हल्ला झालाच तर त्याचा जपानलाही फार मोठा धोका संभवतो. कारण तैवानवरील हल्ल्यानंतर जपान चीनचे पुढचे लक्ष्य असेल. अशा परिस्थितीत, तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकेसह जपान देखील या संघर्षात उडी घेईल, असा सार्या जगाचे लक्ष वेधून घेणारा इशारा जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी दिला. तैवानवर आपला अधिकार सांगणार्या चीनकडून जळजळीत प्रतिक्रिया आली आहे.
जपानचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री तारो आसो यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना तैवानची सुरक्षा जपानशी जोडलेली असल्याचा दावा केला. आपल्या भाषणात उपपंतप्रधान तारो आसो यांनी चीनचा थेट उल्लेख टाळला. ‘येत्या काळात तैवानवर हल्ला झाला तर त्यामुळे जपानच्या अस्तित्वाला धोका संभवेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही’, असे उपपंतप्रधान आसो म्हणाले.
याबाबत अधिक विस्तृतपणे बोलताना, तैवानची सागरीसीमा जपानच्या ओकिनावा बेटांपासून जवळच असल्याची आठवण जपानच्या उपपंतप्रधानांनी करून दिली. त्यामुळे, तैवानवरील हल्ल्यानंतर जपान पुढचे लक्ष्य ठरेल, असा दावा आसो यांनी केला. असे झाले तर तैवानच्या संरक्षणासाठी जपान अमेरिकेसह या संघर्षात उडी घेईल, असे जपानचे उपपंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आपल्या या भाषणात आसो यांनी ‘जपानच्या अस्तित्वाला धोका’ असे सूचक शब्द वापरले. तैवानवर हल्ला झालाच, तर जपान स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करील, याची जाणीव उपपंतप्रधान आसो यांनी करून दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तैवानबाबत जपानचे सरकार अधिक आक्रमक धोरण स्वीकारत असल्याचे आसो यांनी दाखवून दिले.
गेल्या काही आठवड्यांपासून जपानच्या सुगा सरकारने तैवानच्या सुरक्षेबाबत अधिक उघड भूमिका स्वीकारली आहे. काही दिवसांपूर्वी जपानचे संरक्षणमंत्री नोबूआ किशी यांनी देखील तैवानची सुरक्षा जपानशी जोडलेली असल्याचा इशारा दिला होता. तसेच चीन-तैवानमधील संबंधावर जपानची बारीक नजर असल्याचे संरक्षणमंत्री किशी म्हणाले होते.
त्यानंतर जपानचे उपसंरक्षणमंत्री योशिहिदे नाकायामा ‘तैवान हा लोकशाही असलेला देश’ असा उल्लेख करून चीनला डिवचले होते. तसेच चीनच्या ‘वन चायना धोरणा’ला पाठिंबा देऊन मोठी चूक केल्याचे नाकायामा म्हणाले होते. तर सोमवारी जपानच्या उपपंतप्रधानांनीच तैवानची सुरक्षा जपानशी जोडल्यानंतर चीनची बेचैनी वाढली आहे.
जपानच्या उपपंतप्रधानांची ही विधाने चीनबरोबरच्या संबंधांसाठी मारक ठरतील, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी दिला. त्याचबरोबर चीनचे सार्वभौमत्व आणि चिनी जनतेची इच्छाशक्ती कमी लेखण्याची चूक कुणीही करू नये, असे लिजिआन यांनी धमकावले. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने देखील जपानच्या उपपंतप्रधानांच्या या विधानांवर टीका करून जपानने इतिहासातून धडा घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, जपानने तैवानसाठी 11 लाख कोरोनाच्या लसी पुरविण्याची घोषणा केली आहे. जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. येत्या गुरुवारी जपानचे विमान तैवानमध्ये या लसी घेऊन पोहोचेल, असे मोतेगी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच जपानने तैवानला 12 लाखांहून अधिक लसी पुरविल्या होत्या. जपानने तैवानला पुरविलेल्या या लसीवरही चीनने जोरदार आक्षेप घेतला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |