वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या 40 लाखांवर गेली आहे. अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने बुधवारी यासंदर्भातील माहिती जाहीर केली. सर्वाधिक सहा लाख बळी अमेरिकेतील असून त्यानंतर ब्राझिल व भारताचा क्रमांक लागतो. जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) खर्या बळींची संख्या याहून जास्त असू शकते, असे बजावले आहे. त्याचवेळी कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिका व जर्मनीतील रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाख, 4 हजार, 516वर गेली आहे. सर्वाधिक 6 लाख, 6 हजार, 228 बळी अमेरिकेत गेले आहेत. त्यापाठोपाठ ब्राझिलमध्ये 5 लाख, 28 हजार, 540 जणांचा बळी गेला आहे. यानंतर भारत, मेक्सिको व पेरु या देशांचा समावेश आहे. जगातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 18 कोटी, 52 लाखांवर गेली आहे.
2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात माजविलेला हाहाकार अजूनही कायम आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर पहिले 10 लाख बळी जाण्यासाठी जवळपास साडेनऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र आता हा वेग वाढला असून अवघ्या अडीच महिन्यात 10 लाख बळींची नोंद झाली आहे.
बळींच्या संख्येबरोबरच कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिका व ब्रिटनसह युरोप, आफ्रिका व आशियातही रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या वाढीमागे कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनमध्ये जानेवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच 24 तासांमध्ये 30 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर अमेरिकेत गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातील रुग्णांची संख्या 21 टक्क्यांनी वाढली आहे. जर्मनीत या आठवड्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 59 टक्के रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.
आशिया खंडातील इंडोनेशिया, बांगलादेश यासारख्या देशांमधील रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बांगलादेशमध्ये बुधवारी 11 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 24 तासात 201 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर इंडोनेशियात वाढती रुग्णसंख्या व बळींमुळे देशातील आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ‘ईस्टर्न मेडिटेरिअन रिजन’ क्षेत्रातील (भूमध्य समुद्राचा पूर्व भाग) 22 देशांमध्ये कोरोनाची साथ तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. आखाती देश व उत्तर आफ्रिकेतील या देशांमध्ये आतापर्यंत एक कोटींहून अधिक रुग्ण आढळले असून, दोन लाखांहून अधिक जण दगावले आहेत. या क्षेत्रातील 22 पैकी 13 देशांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ पसरला असल्याचे समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |