बीजिंग – चीनने तैवानवर हल्ला चढविला, तर त्यापासून जपानला तितकाच धोका संभवतो, असे सांगून जपानने तैवानसाठी युद्धात उडी घेण्याचे इशारे दिले आहेत. त्यावर संतापलेल्या चीनने जपानला थेट आण्विक हल्ले चढविल्याची धमकी दिली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्यांनी ही धमकी प्रसिद्ध केली असून जपान शरण येईपर्यंत या देशावर अणुबॉम्ब टाकले जातील, असे एका व्हिडिओद्वारे चिनी अधिकार्यांनी बजावले. यासाठी चीनने आपले पारंपरिक आण्विक धोरण बदलावे, अशी मागणी या अधिकार्यांनी केली आहे.
चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये जपानला धमकावले. ‘तैवानला चीनमध्ये विलिन करण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात जपानने आपले विमान किंवा विनाशिका किंवा एक जवान जरी पाठवला तर चीन फक्त गोळीबार करून शांत बसणार नाही. तर जपानविरोधात संपूर्ण युद्ध पुकारेल. अणुबॉम्ब टाकून जपानवरील हल्ल्याची सुरुवात होईल आणि जोपर्यंत जपान इतिहासातील बिनशर्त शरणागती पत्करणार नाही, तोपर्यंत चीनच्या अणुबॉम्बचे हल्ले सुरू राहतील’, अशी धमकी या व्हिडिओतून देण्यात आली आहे.
या व्हिडिओच्या अखेरीस चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने आपल्या आण्विक धोरणात बदल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘तैवानच्या संरक्षणासाठी आपले लष्कर रवाना करण्याची घोषणा करणार्या जपानला परवडणार नाही, अशी किंमत मोजण्यास भाग पाडले पाहिजे. यासाठी चीनने आपल्या पारंपरिक आण्विक धोरणात, डावपेचात बदल करावे. पहिला अणुहल्ला चढविणार नाही, या चीनच्या धोरणातून जपानला वगळावे’, अशी शिफारस यात करण्यात आली आहे.
रविवारी चीनच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ‘लियुझून टालू’ चिनी लष्कराच्या चॅनेलने हा व्हिडिओ तयार केला. पुढच्या काही तासात हा व्हिडिओ काढून टाकला होता. पण त्यानंतर चीनच्या शांक्सी प्रांतातील कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकार्यांनी हा चिथावणीखोर व्हिडिओ नव्याने पोस्ट केला. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या चीनची कम्युनिस्ट पार्टी तैवानच्या विलिनीकरणाची आणि जपानवरील अणुहल्ल्याची धमकी देत असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने देखील तैवानसाठी युद्धात उडी घेण्याची घोषणा करणार्या जपानला धमकावले होते. तैवानच्या संरक्षणासाठी जपानने हस्तक्षेप केला तर चीनबरोबरच्या युद्धात वाईट पराभव होईल आणि असह्य परिणामांना सामोरे जावे लागेल, असे चीनच्या मुखपत्राने बजावले होते.चीनच्या लष्करी सामर्थ्यासमोर जपानचा निभाव लागणार नसल्याचा दावा चिनी मुखपत्राने केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |