सायबरहल्ल्यांमुळे अमेरिका व शत्रूदेशामध्ये युद्ध भडकेल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को/बीजिंग – येत्या काळात अमेरिकेवर मोठा सायबरहल्ला झाला तर त्यातून शत्रूदेशाविरोधात खरे युद्ध पेट घेऊ शकेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. गेल्या काही दिवसात अमेरिकेने चीन व रशिया या दोन्ही देशांना सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून लक्ष्य केले होते. त्यामुळे बायडेन यांनी चीन व रशियालाच युद्धाचा इशारा दिल्याचा दावा केला जात आहे.

गेल्या आठवड्यात ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेंज सर्व्हर’वरील हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, सायबरहल्ल्यांमध्ये चीन हा रशियापेक्षा वाईट व घातक देश असल्याचा आरोप करून हल्ले करणार्‍या हॅकर्सना चीन आश्रय तसेच आवश्यक सुविधा पुरवित आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकी यंत्रणांनी गेल्या दशकातील सायबरहल्ल्यांची माहिती जाहीर करताना त्यामागेही चीनचे हॅकर्स असल्याचे सांगितले होते.

चीनवर ठेवलेल्या ठपक्यापूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी रशियालाही लक्ष्य केले होते. गेल्या महिन्यात जीनिव्हामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरील भेटीत, रशियाने संवेदनशील क्षेत्रांमध्ये सायबरहल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे बायडेन यांनी बजावले होते. त्यापाठोपाठ, अमेरिकेवर झालेल्या रॅन्समवेअर सायबरहल्ल्यांप्रकरणी रशियाने कारवाई करावी, तसे न झाल्यास रशियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर, मंगळवारी अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बायडेन यांनी, सायबरहल्ल्याच्या मुद्यावर बोलताना ‘रिअल शूटिंग वॉर’चा केलेला उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. ‘जर पुढील काळात अमेरिकेचे एखाद्या मोठ्या देशाबरोबर खरे युद्ध झालेच तर त्याचे कारण सायबरहल्ला असेल. अमेरिकेला मोठा हादरा देणारा, प्रचंड परिणाम घडविणारा सायबरहल्ला झाल्यास त्याचे रुपांतर युद्धात होऊ शकते’, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले.

अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या ‘सोलरविंड्स’ सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा आरोप अमेरिकी यंत्रणांकडून करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी याप्रकरणी रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही दिले होते. अमेरिकी यंत्रणांकडून रशियावर सायबरहल्ले चढविले जातील असा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्यानंतर अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील हल्ले झाले असून कोट्यावधी डॉलर्सची खंडणीही मागण्यात आल्याचे समोर आले होते. रशियाबरोबरच चीननेही अमेरिकी यंत्रणा व कंपन्यांवर मोठे सायबरहल्ले केल्याचे उघड झाले आहे.

यापूर्वी सायबरहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकी यंत्रणांनी ‘सायबर वेपन्स’ विकसित केल्याची माहितीही समोर आली होती. मात्र आता अमेरिकेचे धोरण अधिक आक्रमक झाले असून बायडेन यांनी सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून प्रत्यक्ष युद्धाचा इशारा देणे त्याचेच संकेत ठरतात.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info