काबुल – अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात एका जवानाचा बळी गेला. या हल्ल्यासाठी तालिबान जबाबदार असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघ करीत आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला चढवून तालिबानने गंभीर चूक केल्याचा दावा केला जातो. यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.
अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे दहशतवादी येथील प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हेल्मंड प्रांताच्या लश्करगह शहरावर हल्ला चढविला. अफगाणी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात बराच काळ संघर्ष सुरू होता. याला काही तास उलटत नाही तोच तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात प्रांताची राजधानी हेरात शहर ताब्यात घेण्यासाठी हल्ला केला.
साधारण दोन तास अफगाणी लष्कराबरोबर चाललेल्या संघर्षानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर, रॉकेट ग्रेनेड्सचे हल्ले चढविले तसेच जोरदार गोळीबार केला. तालिबानच्या या हल्ल्यात राष्ट्रसंघाच्या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात जवानाचा बळी गेला. या हल्ल्याचे तपशील समोर आलेले नाहीत.
पण प्रांतांच्या राजधान्यांवर हल्ले चढवून व त्यातही संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर हल्ला करून तालिबानने दोहा येथील करारांचे उल्लंघन केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. दोहा करारानुसार, तालिबानने प्रांतांच्या राजधान्यांवर हल्ले चढवू नये, असे ठरले होते. तसेच पाश्चिमात्य देशांचे जवान आणि इमारतींचे करणार नाही, असेही तालिबानने मान्य केले होते. पण हेरातमधील हल्ल्यानंतर तालिबान दोहा येथील करार मानत नसल्याचे उघड होत आहे.
तालिबानच्या या हल्ल्यानंतर अमेरिका व मित्रदेशांकडून प्रत्युत्तराची शक्यता वाढली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी तसा इशाराच दिला होता.