अफगाणिस्तान व अमेरिकेच्याही सुरक्षेसाठी तालिबानवर घणाघाती हवाई हल्ले चढवा – अमेरिकेच्या सिनेटर्सकडून बायडेन प्रशासनावर दबाव

वॉशिंग्टन – ‘तालिबानला राजधानी काबुलचा ताबा घेण्यापासून रोखण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही. यासाठी त्वरीत तालिबानवर घणाघाती हवाई हल्ले चढवा आणि काबुलच्या सुरक्षेसाठी अफगाणी लष्कराला आवश्‍यक ते सर्व सहाय्य पुरवा. बायडेन प्रशासनाने वेळीच ही कारवाई केली नाही तर, निष्पाप अफगाणी जनतेला याची भयंकर किंमत चुकवावी लागेल आणि अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला धोका अधिकच वाढेल’, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर मिश मॅक्कॉनेल यांनी दिला. मॅक्कॉनेल यांच्याप्रमाणे सिनेटर मायकल वॉल्ट्झ यांनी देखील तालिबानवर हवाई हल्ले व तालिबानला सहाय्य करणाऱ्या पाकिस्तानवर निर्बंध लादावे, अशी मागणी बायडेन प्रशासनाकडे केली आहे.

हवाई हल्ले चढवा

तालिबानचे दहशतवादी राजधानी काबुलपासून अवघ्या 10 किलोमीटरवर पोहोचले आहेत. पुढच्या काही तासात तालिबान काबुलवर हल्ले चढवील, असे इशारे दिले जात आहेत. तालिबानने काबुलसह अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेतल्यानंतर पुन्हा या देशात अल कायदाचा उदय होण्याचा धोका वाढल्याचे अमेरिकेचे मित्रदेश बजावत आहेत. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने तालिबानवर हवाई हल्ले चढवावे, अशी मागणी अमेरिकेत जोर पकडू लागली आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी बायडेन प्रशासनाने राष्ट्राध्यक्ष गनी यांचे सरकार आणि लष्कराला सहाय्य करावे, असे आवाहन सिनेटर मॅक्कॉनेल यांनी केले. यासाठी अमेरिकेने काबुलकडे पोहोचणाऱ्या तालिबानवर घणाघाती हवाई हल्ले चढवावे, असे मॅक्कॉनेल म्हणाले. अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या राजदूत अदेला राझ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकन सिनेटर मॅक्कॉनेल यांनी ही मागणी केली. मॅक्कॉनेल यांच्याबरोबर अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर आणि अफगाणिस्तानात सेवा बजावलेले माजी लष्करी अधिकारी मायकल वॉल्ट्झ यांनीही तालिबानवर हवाई हल्ले चढविण्याची मागणी उचलून धरली.

अफगाणिस्तानला वाचविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना स्पष्ट आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे वॉल्ट्झ यांनी ठणकावले. यासाठी सिनेटर वॉल्ट्झ यांनी तीन पर्याय सुचविले. ‘तालिबानवर हवाई हल्ले चढवा, पाकिस्तानवर निर्बंध लादा आणि विशेषदूत झल्मे खलिलझाद यांना बडतर्फ करा. या तीन ठोस पावलांनी अफगाणिस्तान व या देशातील लोकशाही अजूनही वाचविता येऊ शकते. पण यासाठी अमेरिकेला धाडसी नेतृत्वाची आवश्‍यकता आहे’, असे वॉल्ट्झ म्हणाले.

हवाई हल्ले चढवा

तालिबानचे दहशतवादी बिनधास्तपणे रस्त्यावरुन फिरत आहेत. 2001 साली ज्याप्रमाणे अमेरिकेने हवाई हल्ले चढवून तालिबानला बेजार केले होते, तशीच हवाई कारवाई आत्ताही करण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर तालिबानची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानातील त्यांच्या समर्थकांनाही कडक संदेश देणे जरूरी असल्याचे वॉल्ट्झ म्हणाले.

“तालिबानच्या सामर्थ्यात झालेल्या वाढीसाठी पाकिस्तानचे लष्करच जबाबदार आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सुरू केलेल्या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे पाकिस्तान सांगत असला तरी पाकिस्तानच सक्रीयपणे तालिबानला शस्त्रसज्ज करीत आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारे सर्व सहाय्य रोखून पाकिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादावे”, असे वॉल्ट्झ यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ठासून सांगितले.

त्याचबरोबर तालिबान बदलली आहे. अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करून ही संघटना सरकारमध्ये सामील होण्यास तयार आहे, असे सांगून अमेरिका व जगाची फसगत करणारे अमेरिकेचे विशेषदूत झल्मे खलिलझाद यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकावे, अशी मागणी वॉल्ट्झ यांनी केली. बायडेन प्रशासनाने आपल्या भूमिकेत वेळीच बदल केला नाही, तर अल कायदाचे अफगाणिस्तानात वादळी पुनरागमन येईल आणि ते अमेरिकेवर पुन्हा हल्ला चढवतील, असा इशारा वॉल्ट्झ यांनी दिला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info