बीजिंग – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे आत्मविश्वास वाढलेला चीन अमेरिका आणि तैवानला धमकावत सुटला आहे. अशा पारिस्थितीत तैवानमध्ये अमेरिकेचे 30 हजार जवान तैनात असल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटरने सोशल मीडियावर केला होता. याची गंभीर दखल चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने घेतली. अमेरिकन सिनेटरचा हा दावा खरा असेल, तर ही युद्धाची घोषणा असून चीनने अमेरिकी जवानांचा खातमा करावा आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर तैवानला चीनमध्ये विलीन करावे, असा सल्ला चीनच्या मुखपत्राने आपल्या कम्युनिस्ट राजवटीला दिला.
अमेरिकन सिनेटच्या ‘गुप्तचर निवड समिती’चे वरिष्ठ सदस्य सिनेटर जॉन कॉर्निन यांनी तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर महत्त्वाचा दावा केला होता. अफगाणिस्तानातील अमेरिकी जवानांच्या तैनातीबाबत बोलताना कॉर्निन यांनी जगभरातील प्रमुख देशांमध्ये अमेरिकी जवानांच्या तैनातीची माहिती दिली होती. दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी, आफ्रिकन देशांसह तैवानमध्येही अमेरिकेचे जवान तैनात असल्याचे कॉर्निन यांनी म्हटले होते. तैवानमधील अमेरिकी जवानांची संख्या 30 हजार इतकी असल्याचा दावा कॉर्निन यांनी केला होता. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या माघारीनंतर चीनने तैवान गिळंकृत करण्याची धमकी दिल्यानंतर सिनेटर कॉर्निन यांनी ही माहिती प्रसिद्ध करून चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे.
याची दखल चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने घेऊन थेट अमेरिकेला धमकावले. सिनेटर कॉर्निन हे अमेरिकन सिनेटच्या समितीचे जबाबदार सदस्य तसेच याआधी रिपब्लिकन काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या माहितीला नक्कीच आधार असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा चिनी मुखपत्राने व्यक्त केला. त्यामुळे तैवानमध्ये खरोखरच अमेरिकेचे 30 हजार तैनात असतील तर ही चीनविरोधात युद्धाची घोषणा असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला. अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी चीनने त्वरीत विघटनवादाच्या विरोधातील कायदा अंमलात आणून तैवानमधील अमेरिकी जवानांना संपवून टाकावे किंवा त्यांना पिटाळून लष्करी बळाच्या जोरावर तैवानला चीनमध्ये विलीन करून घ्यावे, असे चिनी मुखपत्राने सुचविले आहे.
त्याचबरोबर तैवानमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात जवान तैनात करून अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा आरोप चिनी मुखत्राने केला. चीनच्या विश्लेषकांनीही कॉर्निन यांनी प्रसिद्ध केलेली माहिती धक्कायदाक असल्याचे सांगून यामुळे अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकू शकते, असा इशारा दिला आहे. चीनच्या या धमकीवर अमेरिकेची प्रतिक्रिया आलेली नाही. सिनेटर कॉर्निन यांनी देखील काही तासांपूर्वी सोशल मीडियावरुन ही माहिती काढून टाकली. पण कॉर्निन यांच्यासारखे अनुभवी नेते अशी चूक करू शकत नाही, असे सांगून अमेरिका तसेच पाश्चिमात्य विश्लेषक चीनला इशारा देण्यासाठीच कॉर्निन यांनी ही माहिती उघड केल्याचे सांगत आहेत.
दरम्यान, अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तानातून घेतलेल्या माघारीमुळे चीन सुखावला आहे. अफगाणी जनतेची साथ सोडणारा अमेरिका येत्या काळात तैवानलाही असाच सोडून जाईल, असे चिनी माध्यमे धमकावत आहेत. यावर तैवानचे पंतप्रधान सु सेंग-चँग यांनी चीनला इशारा दिला. येत्या काळात आमच्या देशावर हल्ला झालाच तर तैवान अफगाणिस्तानसारखा कोसळणार नाही, असे सांगून पंतप्रधान सेंग-चँग यांनी चीनला बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |