वॉशिंग्टन – “अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर दुहेरी आत्मघाती स्फोट घडवून 13 अमेरिकी जवानांचा बळी घेणाऱ्या ‘आयएस-खोरासन’ला लक्ष्य करून त्यांना याची किंमत मोजायला भाग पाडू”, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. पण त्याचबरोबर ‘आयएस’ला रोखणे हे आता तालिबानच्या हाती असल्याचे सांगून या दहशतवादी संघटनेला मान्यता बहाल केल्याचे संकेत बायडेन यांनी दिले. यामुळे अमेरिकेत बायडेन यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकन सिनेटर्स व जनतेकडून बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी होत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कसेही असले तरी त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकी जवानांचा इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेला नव्हता, अशी प्रतिक्रिया अमेरिकन जनता देत आहे.
गुरुवारी रात्री काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये 103 जणांचा बळी गेला. यामध्ये अमेरिकेच्या 13 मरिन्सचा समावेश असून 15 जण जखमी आहेत. यापैकी 10 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचा दावा केला जातो. गेल्या दहा वर्षात अफगाणिस्तानातील संघर्षात अमेरिकेला इतकी मोठी जीवितहानी सोसावी लागली नव्हती. त्यामुळे अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत गोंधळ घालणाऱ्या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकन जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे.
त्यातच गुरुवारी उशीरा बायडेन यांनी आपल्या भाषणात तालिबानच्या कारवायांकडे कानाडोळा करून आयएस-खोरासनवर ताशेरे ओढले. काबुल विमानतळावरील हल्ल्यानंतर ‘आयएस-खोरासन’चा धोका अधिकच वाढल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी दिला. त्याचबरोबर आपले प्रशासन तालिबानच्या संपर्कात असल्याचेही बायडेन आणि मॅकेन्झी यांनी सांगितले.
मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन दहशतवादी संघटनांमध्ये ‘गुड’ आणि ‘बॅड’ असा फरक करीत असल्याचा आरोप अमेरिकी माध्यमांमधून सुरू झाला. त्याचबरोबर बायडेन यांच्या चुकीमुळे अमेरिकी जवानांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. बायडेन यांनी तालिबानसोबत चर्चा करून सैन्यमाघारीची मुदत वाढविण्यापेक्षा तालिबानसमोर नमते घेतले, असा संताप अमेरिकन माध्यमे व विश्लेषक करीत आहेत. अफगाणिस्तानातील चुकांची जबाबदारी स्वीकारून बायडेन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अमेरिकन जनतेकडून होत आहे. विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीने तर बायडेन यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याची घोषणा केली आहे. पण अमेरिकन सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत नसल्यामुळे बायडेन यांच्याविरोधातील महाभियोगाला अपेक्षित समर्थन मिळणार नसल्याचा दावा केला जातो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काबुल विमानतळावरील स्फोटात बळी गेलेल्या अमेरिकी जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. ‘मी राष्ट्राध्यक्ष असतो तर, ही शोकांतिका टाळली असती’, असे ट्रम्प म्हणाले. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या दाव्याला अमेरिकन जनतेचा पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री काँडोलिझा राईस यांनी अमेरिकेच्या इतिहासातील हा दु:खद दिवस असल्याची नोंद केली.
‘अफगाणिस्तानात साधता येऊ शकणार नाहीत अशी उद्दिष्टे समोर ठेवून अमेरिकेने आपला व्यूहरचनात्मक दृष्टीकोनच गमावला. गेल्या 20 वर्षात दहशतवादविरोधी युद्धात सहभागी झालेल्या आपल्या मित्रदेश आणि संबंधितांशी चर्चा न करता किंवा इशारा न देता अमेरिकेने येथून माघार घेतलीच कशी?’ असा सवाल अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |