अफगाणिस्तानमधील पाश्‍चात्यांची अपमानास्पद माघार चीनच्या महत्त्वाकांक्षांना बळ देणारी

ब्रिटनच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा दावा

लंडन/काबुल – ‘अमेरिकेसह पाश्‍चात्यांनी अफगाणिस्तानातून घेतलेली माघार हे परराष्ट्र धोरणातील ऐतिहासिक अपयश ठरते. ही अपमानास्पद माघार चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षांना बळ देणारी आहे’, असा दावा ब्रिटनचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किम डॅरोक यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी केलेली ‘अमेरिका इज बॅक’ची घोषणा किती पोकळ आहे हे अफगाणिस्तानमधून घाईघाईने घेतलेल्या माघारीवरून दिसून येते, अशा शब्दात डॅरोक यांनी अमेरिकेच्या निर्णयावर कोरडे ओढले. काही दिवसांपूर्वी युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाश्‍चात्यांच्या माघारीनंतर चीन व रशिया अफगाणिस्तानवर ताबा मिळवतील, असे बजावले होते.

अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून काम केलेल्या व सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या डॅरोक यांनी, अफगाणिस्तानमधील घटनाक्रम जागतिक स्तरावरील सत्ताकेंद्रात होणाऱ्या बदलाचे संकेत असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील पाश्‍चात्य देशांच्या माघारीकडे चीन व रशिया हे दोन बारकाईने नजर ठेऊन असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रशियाने अफगाणिस्तानात पराभव पाहिला आहे, त्यामुळे हा देश अफगाणिस्तानात जास्त प्रमाणात हस्तक्षेप करणार नाही, मात्र फायद्याच्या संधी नक्कीच शोधेल, असे डॅरोक यांनी बजावले. सर्वाधिक लाभ उठविण्याची संधी चीन साधू शकतो, असा इशारा ब्रिटनच्या माजी अधिकाऱ्यांनी दिला.

‘अफगाणिस्तानमधील माघार म्हणजे अमेरिकेकडे धोरणात्मक सहनशक्ती नसून, हा देश एखादी मोहीम अर्धवट सोडून बाहेर पडू शकतो हा चीनचा समज अधिक दृढ करणारी घटना ठरली आहे. त्यामुळे चीन आपल्या महत्त्वाकांक्षा अधिक आक्रमकपणे राबविण्यास सुरुवात करेल. साऊथ चायना सीमधील शेजारी देशांवर दडपण टाकणे, तैवानला धमकावणे यासारख्या गोष्टी चालू राहतील. त्याचवेळी बेल्ट ॲण्ड रोडसारख्या योजनेतून स्वतःचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव वाढविण्याच्या कार्यालाही वेग येईल’, अशा शब्दात डॅरोक यांनी चीनच्या संभाव्य हालचालींकडे लक्ष वेधले.

‘जागतिक स्तरावर सध्याचा काळ आपला आहे, असा चीनच्या राज्यकर्त्यांचा समज आहे. अफगाणिस्तानमधील पाश्‍चात्यांची माघार हा समज अधिक दृढ करणारी ठरली आहे. कदाचित चीनला वाटणारा समज खराही असू शकेल’, असे ब्रिटनच्या माजी राजदूतांनी बजावले. यावेळी डॅरोक यांनी अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांनी अफगाणिस्तानात अधिक काळ तैनाती ठेवायला हवी होती, असा सल्लाही दिला. आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांनी दक्षिण कोरिया, सायप्रस, बोस्निया, कोसोवो यासारख्या देशांमध्ये दशकानुदशके असणाऱ्या लष्करी तैनातींकडे लक्ष वेधले. अफगाणिस्तानमधील माघारीबाबत अमेरिकेने घेतलेला निर्णय व त्याची बायडेन प्रशासनाकडून झालेली अंमलबजावणी घटनेने अमेरिका व ब्रिटनमधील ‘स्पेशल रिलेशनशिप’वरही परिणाम झाल्याचा दावा डॅरोक यांनी केला.

बायडेन यांनी ‘अमेरिका इज बॅक’ची घोषणा देताना प्रत्यक्षात ‘अमेरिका फर्स्ट’चेच धोरण राबविले, अशी टीकाही अमेरिकेत राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या डॅरोक यांनी केली. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील माघारीने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर कधीही दूर करता येणार नाही, असा कलंक लागल्याचा दावाही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info