तालिबानचे सरकार फार काळ टिकू शकणार नाही – युरोपिय विश्‍लेषकाचा इशारा

पॅरिस/काबुल – तालिबानने घोषित केलेले सरकार सर्वसमावेशक नाही. अफगाणिस्तानातील सर्व सामाजिक घटकांना या सरकारमध्ये सामावून घेतलेले नाही. म्हणूनच हे सरकार फार काळ टिकू शकणार नाही, असा इशारा युरोपिय विश्‍लेषक विल्यम डॅलिम्पल यांनी दिला. त्याचबरोबर तालिबानच्या क्रौर्याच्या भयंकर बातम्या जगासमोर येत आहेत. तालिबानने अफगाणी जवानाचे शिरकाण करून त्याचा जल्लोष केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर तालिबानच्या राजवटीत आपली धडगत नसल्याची जाणीव झालेले अफगाणी कलाकार, संगीतकार देश सोडून चालले आहेत. या सर्वांना दिलासा देणारा दावा विश्‍लेषक विल्यम डॅलिम्पल केला आहे.

टिकू शकणार नाही

अफगाणिस्तानातील आपले सरकार सर्वसमावेशक असेल, महिलांच्या अधिकारांचा आदर केला जाईल, अशी आश्‍वासने तालिबानने गेल्या काही महिन्यांमध्ये दिली होती. पण गेल्या आठवड्यात जाहीर केलेले तालिबानचे सरकार पाहता, ही आश्‍वासने पाळली जाणार नाहीत, हे उघड झाले आहे, अशी टीका डॅलिम्पल यांनी केली. महिलांचे अधिकार डावलून तालिबानने जुनी चूक नव्याने केल्याची जाणीव डॅलिम्पल यांनी करून दिली.

‘माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई किंवा इतर माजी नेते तसेच अल्पसंख्यांकांना सरकारमध्ये तालिबानने स्थान दिले नसते, तरी आंतरराष्ट्रीय समुदायाने समजून घेतले असते. पण स्वत:च केलेल्या प्रचाराला साथ देण्यासाठी तालिबानने सरकारमध्ये महिलांना जागा द्यायला हवी होती’, असे डॅलिम्पल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

टिकू शकणार नाही

तालिबानचे हे सरकार सर्वसमावेशक नसल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन अर्थसहाय्य मिळणे देखील अवघड बनल्याचा दावा डॅलिम्पल यांनी केला. यामुळे तालिबानला अधिक काळ सरकार चालविणे शक्य नसल्याचे संकेत डॅलिम्पल यांनी दिले. कारण अमेरिका व पाश्‍चिमात्य मित्रदेशांनी अफगाणिस्तानचे जवळपास नऊ अब्ज डॉलर्सचे सहाय्य गोठित केले आहे.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणारे अन्नधान्याचा पुरवठा देखील सप्टेंबर महिनाअखेरीस संपुष्टात येईल, असा इशारा आठवड्यापूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने दिला होता. तर अफगाणिस्तान लवकरच अन्नधान्याच्या टंचाईला सामोरे जाईल, अशी चिंताही व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत, सरकार आणि देश चालविणे तालिबानसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा दावा केला जातो. येत्या काळात तालिबानमधील असंतुष्ट गटांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यताही अमेरिका व ब्रिटनचे लष्करी विश्‍लेषक व माजी अधिकारी वर्तवित आहेत. अल कायदा अफगाणिस्तानात पुन्हा एकदा डोके वर काढेल आणि अमेरिका व ब्रिटनच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक ठरेल, असे इशारे या दोन्ही देशांचे अधिकारी देत आहेत.

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा सुरक्षाप्रमुख हनीफ अत्मार हा गेल्या आठवड्यातच अफगाणिस्तानात परतला होता. तर काबुल विमानतळाजवळ आत्मघाती स्फोट घडवून ‘आयएस-खोरासन’ने देखील तालिबानविरोधी आघाडीचे संकेत दिले होते. अशा परिस्थितीत, येत्या काळात तालिबानची राजवट अफगाणिस्तानात फार काळ टिकणार नसल्याचा डॅलिम्पल यांचा दावा प्रत्यक्षात उतरणार असल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info