रशियाने क्रिमिआ ताब्यात घेतला तसाच चीन तैवानचा घास घेईल

जपानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

टोकिओ/तैपेई – रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून क्रिमिआचा ताबा घेतला आणि हा भूभाग आपल्या देशाला जोडून टाकला. त्याच धर्तीवर चीन तैवानवर आक्रमण करु शकतो, असा इशारा जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी दिला. अमेरिकी अभ्यासगटाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. चीन व रशियाच्या युद्धनौकांच्या ‘सी ऑफ जपान’मधील संयुक्त गस्तीच्या पार्श्‍वभूमीवर, जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिेलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

क्रिमिआ

गेल्या काही महिन्यांपासून चीनची राजवट तैवानविरोधात अधिकाधिक आक्रमक होत आहे. या महिन्याच्या पहिल्या चार दिवसात, चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी ठरली होती. त्यापाठोपाठ, चीनचे एकत्रीकरण वास्तवात उतरणार असून ते शांततापूर्ण मार्गाने घडविणे तैवानी जनतेच्या हिताचे असेल, अशी धमकी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली होती.

विमानांची घुसखोरी व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या इशार्‍याव्यतिरिक्त चीनने तैवानवरील आक्रमणासाठी विविध भागांमध्ये सराव सुरू केल्याचे व तैनाती वाढविल्याची माहितीही समोर येत आहे. चिनी माध्यमांनी तैवानला ‘डूम्सडे’ला तोंड द्यावे लागेल, असे बजावले आहे. तसेच चीनच्या संरक्षण विभागाने, तैवानविरोधातील कारवाईसाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ हाय अलर्टवर असल्याचेही वक्तव्य केले होते. यामुळे चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञांनी संघर्षाचे भाकितही वर्तविले आहे. यामुळे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

क्रिमिआ

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ‘सीएसआयएस’ या अभ्यासगटाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाच्या क्रिमिआवरील कारवाईचा उल्लेख केला. ‘रशियाच्या कारवाया बेकायदेशीर होत्या. पण लष्करी तैनाती न करता रशियाने क्रिमिआतील कारवाई केली होती. त्यापूर्वी सायबरहल्लेही चढविण्यात आले होते. याच धर्तीवर कोणाच्याही नकळत लष्करी बळाचा वापर न करता तैवानविरोधातील युद्धाची सुरुवात होईल’, असा इशारा जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी दिला. संरक्षणमंत्री किशी यांचा हा इशारा चीनकडून तैवानवर होणार्‍या संभाव्य आक्रमणाबाबत असल्याचा दावा ‘निक्केई’ या आघाडीच्या जपानच्या दैनिकाने केला आहे.

या कार्यक्रमातील इतर वक्त्यांनी चीनने तैवानविरोधात सुरू केलेले ‘ग्रे झोन वॉरफेअर’ तसेच ‘हायब्रिड वॉरफेअर’वर गंभीर चिंता व्यक्त केली. रशियाचा क्रिमिआवरील ताबा व चीनकडून वापरण्यात येणारे ‘ग्रे झोन वॉरफेअर’चे धोरण यात सार्धम्य आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. अमेरिकेचे माजी उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड आर्मिटेज यांनीही चीनकडून तैवानवर टाकण्यात येणार्‍या दडपणाबाबत सावध केल्याचे समोर आले आहे.

क्रिमिआ

दरम्यान, जपानने आपल्या सागरी क्षेत्रानजिक चीन व रशियामध्ये झालेल्या नौदल सरावावर तीव्र चिंता व्यक्त केली. जपानचे सरकार या हालचालींवर नजर ठेऊन आहे आणि आपल्या सागरी तसेच हवाईहद्दीच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे जपानचे वरिष्ठ अधिकारी योशिहिको इसोझाकी म्हणाले. चीन व रशियाच्या युद्धनौकांनी जपानच्या होक्कायडो तसेच क्युशु बेटांच्या नजिकच्या क्षेत्रातून प्रवास केल्याची माहितीही जपानच्या अधिकार्‍यांनी दिली.

जपानच्या सागरी क्षेत्रानजिक प्रवास करणार्‍या चीन व रशियाच्या युद्धनौकांनी पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त गस्त घातल्याचेही उघड झाले आहे. रशियाबरोबरील ही गस्त अमेरिका व मित्रदेशांच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी असल्याचा दावा चीनच्या सरकारी माध्यमांनी केला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info