वॉशिंग्टन – ‘दहशतवादी आणि इतर संघटनांकडून ड्रोन्सच्या वाढत असलेल्या वापराकडे अमेरिकेने अधिक गांभीर्याने पहावे. वेळीच या धोक्याविरोधात कारवाई केली नाही तर पुढचा ९/११ सारखा भयंकर स्फोटकांनी सज्ज असलेल्या ड्रोन्सद्वारेच होईल’, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने दिला. तर जैविक किंवा रासायनिक शस्त्रांनी सज्ज असलेले ड्रोन्सदेखील तितकेच खतरनाक ठरू शकतात, अशी चिंता अँटी ड्रोन टेक्नोलॉजी अर्थात ड्रोनभेदी तंत्रज्ञानावर काम करणार्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली.
ड्रोन्सचा वापर करून कुणीही विचार केले नसतील, असे भयंकर हल्ले चढविता येऊ शकतात, असा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने एका साप्ताहिकाशी बोलताना केला. ‘प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये दोन-चार ड्रोन्स आदळून भीषण हल्ला घडविता येऊ शकतो. यामुळे होणारी हानी मोठी असेल आणि ही शक्यता नजिकच्या काळात प्रत्यक्षात उतरू शकते’, असा इशारा या लष्करी अधिकार्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिला. अशाप्रकारे हल्ला घडविण्यासाठी तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती आहे का? यावर उत्तर देताना लष्करी अधिकार्याने अमेरिकेवरील वीस वर्षांपूर्वीच्या हल्ल्याचा दाखला दिला.
‘प्रवासी विमानांचे अपहरण करून दहशतवादी ती विमाने इमारतींवर धडकवतील, याची कल्पना ९/११चा दहशतवादी हल्ल्याआधी कुणीही केली नव्हती. फार आधी कादंबरीकार टॉम क्लॅन्सी यांनी याबाबत लिहून ठेवले होते. तसेच ड्रोनद्वारे घडविण्यात येणार्या पुढच्या ९/११च्या हल्ल्याबाबत निश्चित अशी माहिती नाही. पण छोट्या आकाराच्या, सहजरित्या वापरता येणार्या आणि स्फोटकांनी सज्ज असलेल्या ड्रोन्सचा वापर भीषण दहशतवादी हल्ल्यांसाठी होईल, ही शक्यता आहे’, अशी माहिती अमेरिकी लष्करी अधिकार्याने दिली.
अमेरिकी साप्ताहिकाने ड्रोन हल्ल्याचे गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी काही विश्लेषक व उद्योजकांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. ‘ड्रोनशिल्ड’ या अमेरिकन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओलेग वॉर्निक यांनी ड्रोन हल्ल्यांबाबत अधिकच भयावह शक्यता वर्तविली. कमी खर्चात आणि घातपाती हल्ल्यासाठी परिणामकारक ठरणार्या या ड्रोन्समध्ये स्फोटकांऐवजी जैविक किंवा रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला तर ते अधिक विध्वंसक ठरतील, असा दावा वॉर्निक यांनी केला. या ड्रोन्सच्या खरेदीवर तसेच त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे.
त्याचबरोबर ड्रोन्सचे नियंत्रण करणार्या रिमोट पायलटचा माग काढणे देखील अवघड होऊन बसते, याकडे वॉर्निक यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी नाटोच्या माजी अधिकार्याने ब्रिटिश वर्तमानपत्राशी बोलताना देखील ड्रोनद्वारे जैविक हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा दिला होता. ‘ड्रोन्समध्ये पाच किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. पण हे ड्रोन्स क्लोरिन किंवा मस्टर्ड विषारी वायूने लादून हल्ले चढविता येऊ शकतात’, असा दावा कर्नल हमिश दी ब्रेटन-गॉर्डन यांनी केला.
दरम्यान, गेल्या महिन्याभरात इराक, सिरियामध्ये लक्षवेधी ड्रोन हल्ले झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा हल्ला झाला होता. तर गेल्या आठवड्यात इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांच्या निवासस्थानावरही तीन ड्रोन हल्ले झाले. ओमानच्या आखातातून प्रवास करणार्या इस्रायलच्या मालवाहू जहाजावरही ड्रोन हल्ला झाला होता. अशा परिस्थितीत अमेरिकी अधिकार्याने दिलेल्या इशार्याकडे अमेरिकेसह सर्वच देशांना गांभीर्याने पहावे लागेल.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |