अमेरिकेतील वाढत्या महागाईचा संरक्षणदलांना फटका – युद्धसज्जतेवर परिणाम होत असल्याचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेत भडकलेल्या महागाईचा फटका संरक्षणदलांनाही बसत असून त्याचा परिणाम युद्धसज्जतेवर होत असल्याचा इशारा ‘पेंटॅगॉन’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही यावर चिंता व्यक्त केली असून लष्करात कार्यरत असणार्‍यांच्या कुटुंबियांसाठी विशेष योजनाही जाहीर केली आहे. या योजनेनुसार, सदर कुटुंबियांना अन्नधान्य व इतर गरजांसाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य पुरविण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे माजी आर्थिक सल्लागार स्टिव्हन रॅट्नर यांनी बायडेन प्रशासनाच्या महागाईविषयक धोरणांवर टीकास्त्र सोडले आहे. बायडेन यांनी राबविलेल्या १.९ ट्रिलियन डॉलर्सच्या योजनेचा उल्लेख रॅट्नर यांनी महागाईसाठी कारणीभूत असलेले ‘ओरिजिनल सिन’ असा केला आहे.

महागाईचा

गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या ‘लेबर डिपार्टमेंट’ने महागाईसंदर्भात अहवाल जाहीर केला होता. त्यात गेल्या तीन दशकांच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेत महागाई सर्वाधिक प्रमाणात भडकल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी अमेरिकेतील महागाई निर्देशांक ६.२ टक्क्यांवर गेला आहे. बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या काळात गेले पाच महिने सलग महागाई निर्देशांक पाच टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी १९९०च्या सुमारास अमेरिकेतील महागाई निर्देशांक सहा टक्क्यांच्या वर गेला होता.

बायडेन प्रशासन तसेच फेडरल रिझर्व्हकडून सातत्याने सध्या भडकेलेली महागाई तात्पुरती असल्याची सांगण्यात येत आहे. मात्र अन्नधान्यापासून घर, इंधन, गाड्या, फर्निचर या सर्व घटकांच्या वाढत्या किंमती वेगळे संकेत देत आहेत. या महागाईचे फटका थेट संरक्षण विभागापर्यंत पोहोचल्याने याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांचे वक्तव्यही त्याला दुजोरा देणारे ठरते. ‘संरक्षणदलात कार्यरत जवान व त्यांच्या कुटुंबियांना चिंता करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. त्यात अन्नधान्य व घरांसारख्या मूलभूत बाबींची भर पडता कामा नये’, असे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी बजावले. हा मुद्दा संरक्षण विभागाच्या सज्जतेशी निगडीत असल्याचेही ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. संरक्षणदलातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनीही महागाईचा फटका संरक्षणदलांच्या युद्धसज्जतेवर होऊ शकतो, याकडेही लक्ष वेधले आहे.

महागाईचा

अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी संरक्षणदलातील जवान व कुटुंबियांसाठी अतिरिक्त सहाय्य पुरविणार्‍या योजनेचीही घोषणा केली. त्यानुसार, जवानांच्या कुटुंबियांना अतिरिक्त घरभत्ता पुरविण्यात येणार आहे. त्याचवेळी अन्नसुरक्षा कार्यक्रमाचा लाभ देण्यासाठीही सहाय्य पुरविण्यात येणार आहे. संरक्षण विभागाच्या योजनेमुळे लष्कराशी संबंधित कुटुंबियांच्या सर्व चिंता लगेच दूर होणार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक गोष्टींची टंचाई जाणविणार नाही, याची काळजी घेतली जाईल असेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बायडेन प्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या धोरणांमुळेच महागाई भडकत असल्याची टीका अधिक तीव्र होत चालली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत आर्थिक सल्लागारपद भूषविणार्‍या स्टिव्हन रॅट्नर यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह डेमोक्रॅट्स पक्षावर प्रहार केले आहेत. ‘आपण बायडेन प्रशासनाला महागाईच्या मुद्यावर आधीच इशारा दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनात राजकीय व आर्थिक बाबींची जाण असणार्‍या तज्ज्ञ व्यक्ती असताना महागाईचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळणे अक्षम्य बाब आहे’, अशा शब्दात रॅट्नर यांनी खडसावले.

त्याचवेळी बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर १.९ ट्रिलियन डॉलर्सच्या ‘अमेरिकन रेस्न्यू प्लॅन’ची केलेली अंमलबजावणीच महागाईच्या भडक्यासाठी कारणीभूत ठरल्याचा ठपकाही माजी सल्लागारांनी ठेवला आहे. अर्थसहाय्य पुरविणार्‍या या योजनेमुळे अमेरिकेतील मागणी वाढली व त्याप्रमाणात पुरवठा क्षेत्राला योग्य गती मिळाली नाही, असा दावा रॅट्नर यांनी केला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info