रशिया व चीन हे ब्रिटनसाठी घातक देश

- ब्रिटनच्या मंंत्र्यांचा गंभीर आरोप

लंडन – ‘रशिया आणि चीन हे ब्रिटनसाठी घातक देश ठरतात. या देशांकडे ब्रिटनचा घात करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, सायबर क्षमता आहे. याचा ते ब्रिटनच्या विरोधात वापर करू शकतात’, असा इशारा ब्रिटनच्या ‘सिक्युरिटी अँड बॉर्डर्स’ विभागाचे मंत्री डॅमियन हाईन्ड्स यांनी दिला आहे. या यादीत हाईन्ड्स यांनी इराणचाही समावेश केला असून उत्तर कोरियापासूनही ब्रिटनला धोका असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनसाठी घातक

‘रशिया, चीन आणि इराण या तीन देशांकडे ब्रिटनचा घात करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता आहे. यात हेरांचा वापर, सायबर हल्ले चढविण्याची क्षमता, राखीव सैन्यदल आणि अपप्रचाराची मोहीम राबविण्याच्या ताकदीचा समावेश आहे’, असे सांगून हाईन्डस् यांनी या तिन्ही देशांवर गंभीर आरोप केले आहेत. ब्रिटनच्या विरोधात या तिन्ही देशांकडे अनेक पर्याय आहेत, असा दावा हाईन्डस् यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटन आणि रशियामधील संबंध ताणले जात असून काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने युक्रेनवरील रशियाच्या संभाव्य हल्ल्याविरोधात इशारा दिला होता. तर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख जनरल निक कार्टर यांनी पाश्‍चिमात्य देशांबरोबर रशियाच्या युद्धाचा भडका उडू शकतो, असे बजावले होते. तसेच एकाधिकारशाही असलेले देश आपले हेतू साध्य करण्यासाठी निर्वासितांपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत कुठल्याही गोष्टींचा वापर करू शकतात, याची जाणीव कार्टर यांनी करून दिली होती. याच्याही आधी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाने आपल्या देशावर सायबर हल्ले चढविल्याचे आरोप केले होते.

ब्रिटनसाठी घातक

आता डॅमियन हाईन्ड्स यांनी अशाच स्वरुपाचे गंभीर आरोप केले असून यामुळे ब्रिटनचे रशियाबरोबरील संबंध अधिकच ताणले गेल्याचे दिसत आहे. विशेषतः युक्रेनच्या सीमेवर रशियाने लाखाहून अधिक सैनिक तैनात केल्यानंतर या क्षेत्रात युद्धाचा भडका उडेल व नाटोचे सदस्यदेश या युद्धात उतरतील, असा इशारा विश्‍लेषकांकडून दिला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, नाटोचा प्रमुख सदस्यदेश असलेल्या ब्रिटनने रशियाचा आपल्या पहिल्या क्रमांकाच्या वैरी देशात समावेश करून युरोपातील वातावरण अधिकच ज्वालाग्रही बनविले आहे.

युक्रेनच्या प्रश्‍नावरील तणाव कमी करण्यासाठी रशियाने नाटोला प्रस्ताव दिला असून या प्रस्तावावर १२ जानेवारी रोजी चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेच्या आधी ब्रिटनकडून रशियावर गंभीर आरोप केले जात आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला ब्रिटनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख रिचर्ड मूर यांनीही रशियाकडून आपल्या देशाला संभवणारा धोका वाढल्याचा दावा केला होता. रशियाच्या या कारवायांमुळे द्विपक्षीय संवादाची शक्यता धूसर बनल्याचे मूर म्हणाले होते. रशियाने मात्र आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते. पाश्‍चिमात्य देश रशियावर करीत असलेले हे आरोप म्हणजे रशियाविरोधी प्रचारतंत्राचा भाग असल्याचा ठपका रशियाने ठेवला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info