बीजिंग – चीन आपल्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरूच ठेवेल, असा इशारा चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र चीनच्या आण्विक क्षमतेबाबत अमेरिकेकडून करण्यात येणारे दावे खरे नसल्याचे चीनच्या ‘आर्म्स कंट्रोल डिपार्टमेंटचे महासंचालक फु काँग यांनी म्हटले आहे. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून अण्वस्त्रांबाबत दिलेल्या निवेदनाला 24 तास पूर्ण होण्याच्या आधीच हे दावे करून चीनने आपला दुटप्पीपणा दाखवून दिला.
‘आशियातील सुरक्षाविषयक स्थिती बदलत असून त्या अनुषंगाने चीनला आपल्याजवळ पुरेशी अण्वस्त्रे बाळगणे गरजेचे आहे. अमेरिका आशिया खंडात प्रगत क्षेपणास्त्रे तैनात करीत आहे. भारत व पाकिस्ताने हे देखील अण्वस्त्रसज्ज देश आहेत`, या शब्दात चिनी अधिकाऱ्यांनी अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणाचे समर्थन केले. अमेरिका व रशियाकडे सध्या जगातील 90 टक्के अण्वस्त्रे आहेत आणि त्यांनी आपल्या अण्वस्त्रांचा साठा चीनइतका कमी केला तर चीन अण्वस्त्रे कमी करण्याबाबतच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होईल, असा दावाही फु काँग यांनी केला.
चीनने अण्वस्त्रांच्या मुद्यावर ‘नो फर्स्ट युज पॉलिसी` स्वीकारली आहे व चीन अण्वस्त्रांचा वापर प्रतिबंधक पर्याय म्हणून करणार असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. अण्वस्त्रे युद्ध किंवा संघर्षासाठी नाहीत, असेही काँग यांनी म्हटले आहे. चीनकडे अमेरिका व रशियापाठोपाठ सर्वाधिक म्हणजे 350 अण्वस्त्रे असल्याचे मानले जाते. पुढील काही वर्षात चीन आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या हजारपर्यंत नेऊ शकतो, असे इशारे अमेरिकेसह विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांनी दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |