मॉस्को/ब्रुसेल्स – युक्रेन सीमेवरील तणावाच्या मुद्यावर पाश्चात्य देशांबरोबर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेसंदर्भात ठोस उत्तरे हवी असल्याची मागणी रशियाने केली आहे. रशियाने कोणताही निर्वाणीचा इशारा दिलेला नसून युक्रेनशी थेट चर्चा करायचीही तयारी असल्याचे रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले. बुधवारी बु्रसेल्समध्ये ‘नाटो-रशिया कौन्सिल`ची बैठक पार पडली असून या पार्श्वभूमीवर पेस्कोव्ह यांचे हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. दरम्यान, युक्रेन सीमेनजिक रशियाने नवा लष्करी सराव सुरू केला असून याप्रकरणी अमेरिकेने रशियाकडे खुलासा मागितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे एक लाख जवान तैनात केल्याचा दावा अमेरिका व युक्रेनकडून करण्यात आला आहे. ही तैनाती युक्रेनवरील नव्या आक्रमणाची तयारी असल्याचे इशारे पाश्चात्य नेते तसेच विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत. रशियाने हे दावे फेटाळले असून अमेरिका व पाश्चात्य देश विनाकारण परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी युक्रेनवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘सिक्युरिटी पॅक्ट`चाही प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर रशिया व पाश्चात्य देशांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.
सोमवारी जीनिव्हा शहरात अमेरिका व रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पाडली. यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नसला तरी चर्चा मोकळ्या वातावरणात व व्यावसायिक पातळीवर झाल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात आला. या चर्चेपाठोपाठ बुधवारी ब्रुसेल्समध्ये नाटो-रशिया कौन्सिलची बैठक पार पडली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत रशियाकडून उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को, उपसंरक्षणमंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमिन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर नाटोकडून महासचिव जेन्स स्टॉल्टनबर्ग, अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शेरमन व नाटो सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युक्रेन मुद्यावर नाटो व रशियामध्ये असलेले मतभेद मिटविणे कठीण असल्याची प्रतिक्रिया नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी बैठकीनंतर दिली. रशियाने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. नाटोबरोबरील या बैठकीनंतर गुरुवारी व्हिएन्नामध्ये युरोपिय गट ‘ओएससीई` व रशियादरम्यान बैठक पार पडणार आहे.
नाटोबरोबर बैठक सुरू होत असतानाच रशियाने युक्रेन सीमेनजिक नवा सराव सुरू केल्याचे समोर आले आहे. रशियाच्या वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्टमध्ये सुरू झालेल्या या सरावामध्ये तीन हजारांहून अधिक जवानांसह तोफा, रणगाडे, सशस्त्र वाहने, हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. जर रशियाला सुरक्षेच्या मुद्यावर हमी हवी असेल तर अशा प्रकारचे सराव रशियाने थांबवायला हवेत, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र प्रवक्ते नेड प्राईस यांनी केली. दरम्यान, रशियाची ‘स्पाय शिप` अमेरिकेच्या हवाई बेटांनजिक वावरताना आढळली असून ‘इंडो-पॅसिफिक कमांड`कडून त्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |