बगदाद – इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा रॉकेट हल्ले झाले. येथील प्रवासी विमानाच्या कॉकपिटवर एक रॉकेट आदळल्यानंतर विमानतळावर तणाव निर्माण झाला होता. येथील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीची मागणी करणारे इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
शुक्रवारी सकाळी इराकची राजधानी बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत एका मागोमाग एक असे सहा रॉकेट हल्ले झाले. यातील काही रॉकेट्स विमानतळाची धावपट्टी तर पार्कींग क्षेत्रात कोसळले. तसेच धावपट्टीपासून दूर उभ्या असलेल्या इराकी एअरवेज कंपनीच्या ‘बोईंग ७६७’ प्रवासी विमानतळावर यातील एक रॉकेट आदळले. हे विमान दुरूस्तीखाली असल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून याचा वापर होत नव्हता.
बगदाद विमानतळावरील अमेरिकी लष्कराच्या ‘कॅम्प व्हिक्टरी’ला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले चढविल्याची शक्यता वर्तविली जाते. रॉकेट प्रक्षेपित झालेल्या ठिकाणावर इराकच्या लष्कराने कारवाई करून काही रॉकेट्स व लॉंचर्स जप्त केले आहेत. शुक्रवारच्या या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण याआधीही इराकमधील अमेरिकेच्या लष्करी, हवाई तळांवर ड्रोन्स, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले होते.
दोन वर्षांपूर्वी इराणच्या कुद्स फोर्सेसचा प्रमुख जनरल कासेम सुलेमानी आणि इराकमधील पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेसचा प्रमुख अबू महदी अल-मुहानदीस यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. त्यानंतर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. यासाठी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केला जातो.
अमेरिकेने अफगाणिस्तानप्रमाणे इराकमधून पूर्ण सैन्यमाघारी घ्यावी, अशी मागणी येथील इराणसंलग्न राजकीय गट तसेच सशस्त्र संघटना करीत आहेत. इराकचे माजी पंतप्रधान नवाब नूरी अल-मलिकी देखील इराणसंलग्न गटांच्या मागण्यांचे समर्थन करीत आहेत. बायडेन प्रशासनाने देखील इराकमधून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पण गेल्या काही आठवड्यांपासून सदर निर्णय रेंगाळला आहे. अशा परिस्थितीत, इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवर रॉकेट हल्ले वाढल्याचे दिसतेे.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचे इराकमधील हल्ले देखील तीव्र झाले आहेत. आठवड्यापूर्वी इराकच्या दियाला प्रांतात आयएसच्या दहशतवाद्यांनी इराकच्या लष्करातील ११ जवानांची निघृणरित्या हत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर त्याच्या पुढच्या काही तासात आयएसच्या दहशतवाद्यांनी सिरियातील तुरुंगावर हल्ला चढवून आपल्या शेकडो साथीदारांची सुटका केली होती. त्यानंतर आयएसच्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी इराकने आपली सीमा बंद केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |