रशियाच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांशी तडजोड शक्य नाही

-राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

मॉस्को – पूर्व युक्रेनमधील दोन स्वायत्त भागांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिल्यानंतर रशियाच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. बुधवारी रशियात साजर्‍या झालेल्या ‘डिफेन्डर ऑफ द फादरलॅण्ड डे’च्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी हा इशारा दिला. राष्ट्राध्यक्षांच्या इशार्‍यापूर्वी डोनेस्क व लुहान्स्क या नव्या देशांची सुरक्षा तसेच सार्वभौमत्त्व याची हमी रशियाने घेतल्याचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी जाहीर केले आहे.

सुरक्षाविषयक हितसंबंधांशी

सोमवारी रात्री रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचा भाग असलेल्या डोनेस्क आणि लुहान्स्क या भागांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता घोषित केली होती. यावर युक्रेनसह पाश्‍चात्य देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका व सहकारी देशांनी सदर घोषणा आणि त्यानंतर रशियाने पाठविलेले सैन्य म्हणजे युक्रेनवरील आक्रमणच असल्याची ओरड सुरू केली आहे. पाश्‍चात्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना पुतिन यांनी रशियाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

पहिल्या महायुद्धातील रशियन सैन्याच्या योगदानाची आठवण म्हणून रशियात ‘डिफेन्डर ऑफ द फादरलॅण्ड डे’ साजरा करण्यात येतो. यावेळी पुतिन यांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात रशियन संरक्षणदलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला. ‘रशियाची संरक्षणदले ही देशाच्या सुरक्षेची ठाम हमी देणारी आहेत. त्यामुळे देशाची संरक्षणक्षमता कायम राखणे ही आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब ठरते. गुंतागुंतीच्या समस्यांसाठी खुल्या वातावरणात वाटाघाटी करायला रशिया तयार आहे. मात्र रशियन जनतेची सुरक्षा व देशाचे हितसंबंध या मुद्यांवर आपण कोणतीही तडजोड करणार नाही’, असे पुतिन यांनी बजावले.

पुतिन यांच्या या इशार्‍यापूर्वी परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी रशियाने मान्यता दिलेल्या दोन नव्या देशांबाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘रशियाने नव्या देशांबरोबर मैत्री. सहकार्य व सहाय्याबाबत करार केले आहेत. या करारांद्वारे रशियाने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वांनी याची नीट जाणीव ठेवावी’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाने डोनेस्क व लुहान्स्कमध्ये शांतीसैन्य तैनात केले असून आवश्यकता भासल्यास संरक्षणतळ उभारण्याचेही संकेत दिले आहेत. रशियाच्या या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेन सरकारने देशात आणीबाणीची घोषणा केली असून ‘रिझर्व्ह फोर्स’ सक्रिय करण्याची तयारी सुरू केली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info