अमेरिका व युरोपिय मित्रदेशांकडून रशियन बँकांना ‘स्विफ्ट’मधून वगळण्याचा कठोर निर्णय

- रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंधांचे संकेत

‘स्विफ्ट’

वॉशिंग्टन/लंडन – जगभरातील प्रमुख बँकांमध्ये परस्पर व्यवहारांसाठी वापरण्यात येणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेतून निवडक रशियन बँकांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. अमेरिका, ब्रिटन व युरोपिय मित्रदेशांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घालण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाश्‍चात्यांचे हे नवे निर्बंध रशियन अर्थव्यवस्थेला हादरा देणारे ठरतील, असा दावा करण्यात येतो.

गेल्या आठवड्यात रशियाने दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर अमेरिका, युरोपिय महासंघ व जपानने रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर गुरुवारी रशियन फौजा युक्रेनमध्ये घुसल्यानंतर पाश्‍चात्य देशांनी पुन्हा निर्बंधांची घोषणा केली आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व युरोपिय महासंघाने रशियाच्या इंधन क्षेत्राला वगळता इतर सर्व क्षेत्रांवर आणि संबंधितांवर निर्बंध लादले होते. मात्र हे निर्बंध फारसे प्रभावी नसल्याची टीका आंतरराष्ट्रीय पातळीवरून करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी ‘न्यूक्लिअर ऑप्शन’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘स्विफ्ट’चा केलेला वापर लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

‘स्विफ्ट’

‘सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशन’ असे नाव असलेली यंत्रणा जगभरातील आर्थिक व्यवहारांचा कणा मानला जातो. १९७३ साली स्थापन झालेल्या या यंत्रणेत २०० हून अधिक देशांमधील ११ हजारांहून अधिक बँक्स व वित्तसंस्था जोडल्या गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत पैशांची झटपट व सुरळीत देवाणघेवाण ‘स्विफ्ट’च्या माध्यमातून पार पाडली जाते. दरदिवशी चार कोटींहून अधिक संदेशांच्या माध्यमातून ट्रिलियन डॉलर्सहून अधिक रकमेचे व्यवहार स्विफ्टच्या माध्यमातून होतात. यातील रशियाचा वाटा एक टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

‘स्विफ्ट’

रशियातील जवळपास सर्व प्रमुख बँका ‘स्विफ्ट’शी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिका व मित्रदेशांनी घेतलेला निर्णय रशियाच्या बँकिंग व्यवस्थेला जबरदस्त फटका देणारा ठरु शकतो. मात्र शनिवारी घेण्यात आलेल्या निर्णयात सर्व रशियन बँकांचा समावेश नसून काही बँकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे ‘स्विफ्ट’मधून हकालपट्टी झालेल्या बँकांची नावे समोर आल्यानंतर रशियाविरोधातील निर्णयाची खरी व्याप्ती समोर येऊ शकते. ‘स्विफ्ट’संदर्भातील पर्यायाचा वापर रशियन नागरिक व गुंतवणुकदारांना आर्थिक झळ पोहोचविणारा ठरेल, असे सांगण्यात येते. मात्र त्याचवेळी रशियाने ‘स्विफ्ट’ला पर्याय ठरेल अशी ‘एसपीएफएस’ नावाची यंत्रणा विकसित केली असल्याची जाणीव रशियन विश्‍लेषक करून देत आहेत.

स्विफ्टच्या निर्णयापाठोपाठ रशियाच्या मध्यवर्ती बँकेलाही लक्ष्य करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या बँकेकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात येणार्‍या व्यवहारांवर बंदी घातली जाईल, असे सांगण्यात येते. असे झाल्यास रशियाच्या मध्यवर्ती बँकेला परकीय गंगाजळीचा पूर्ण वापर करता येणार नाही. ही बाब रशिया सरकारला धक्का देणारी ठरेल, असे दावे करण्यात येत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info