किव्ह – युद्धाच्या ११ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या शहरावरील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली. निदान आत्ता तरी आम्हाला वाचवा आणि युक्रेनच्या हवाई हद्दीत नो फ्लाय झोन लागू करा, असा टाहो युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी फोडला आहे. ‘तसे केले नाही, तर त्यातून एकच निष्कर्ष काढता येऊ शकतो, तो म्हणजे आम्ही शांतपणे मृत्यूपंथाला लागत असलेले तुम्हाला पहायचे आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्यांना बजावले आहे. त्यांची ही तीव्र प्रतिक्रिया येत असताना, झेलेन्स्की पुन्हा एकदा रशियाबरोबर चर्चेसाठी तयार झाल्याच्या बातम्या येत आहेत.
चेर्नोबिल आणि त्यानंतर झापोरिझझिया अणुप्रकल्पानंतर युक्रेनचा तिसरा अणुप्रकल्प युझ्नोक्राईन्स्क ताब्यात घेण्याची तयारी रशियाने केली आहे. रशियन लष्कराने या प्रकल्पाच्या दिशेने कूच करून इथे जबरदस्त हल्ले चढविल्याच्या बातम्यात आहेत. रशियाला युक्रेनमध्ये आण्विक घातपात घडवायचा आहे, असा आरोप युक्रेनने सुरू केला आहे. तर रशिया यासाठी युक्रेनला जबाबदार धरत आहे. त्याचवेळी युक्रेनच्या विनित्सिया शहरावर रशिया आठ क्षेपणास्त्रांचा मारा करून इथले विमानतळ उडवून दिले. यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जहाल प्रतिक्रिया देऊन अमेरिका व नाटोवर संताप व्यक्त केला.
रशिया अशारितीने युक्रेनवर हवाई हल्ले चढवून वाताहत करीत असताना, पाश्चिमात्य देश ते खपवून घेत आहेत, असा ठपका राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ठेवला. अमेरिकेने युक्रेनसाठी अधिक लढाऊ विमाने धाडावी आणि युक्रेनच्या हवाई हद्दीत नो फ्लाय झोन लागू करावा, अशी मागणी झेलेन्स्की यांनी उचलून धरली. युक्रेनची निष्पाप जनता अशारितीने रशियन हल्ल्यात बळी पडत असताना, पाश्चिमात्य देश ते शांतपणे पाहत राहिले तर त्यातून एकच निष्कर्ष काढता येऊ शकतो. तो म्हणजे आम्ही शांतपणे मृत्यूपंथाला लागत असलेले तुम्हाला पहायचे आहे, अशी टीका राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली.
या युद्धात युक्रेनी जनतेचा बळी जात असल्याचे दावे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करीत असले, तरी दुसर्या बाजूला या युद्धात रशियाचे ११ हजार जवान ठार केल्याची माहिती युक्रेनकडून दिली जाते. तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनी लष्कराशी निगडीत असलेल्या २,११९ लक्ष्ये उडवून दिल्याचे म्हटले आहे. यापुढेही युक्रेन युद्ध करीत राहिला, तर देश म्हणून युक्रेनचे भवितव्य धोक्यात येईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला.
याआधीही युक्रेन हा कृत्रिमरित्या तयार झालेला देश असल्याचे सांगून या देशाचा राष्ट्रवाद फसवा असल्याची टीका केली होती. पुढच्या काळातही युक्रेनच्या नेतृत्त्वाने हटवादी भूमिका कायम ठेवली, तर युक्रेन शिल्लकच उरणार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष बजावत आहेत. त्याचवेळी पाश्चिमात्यांवर विसंबून रशियाला आव्हान देण्याची घोडचूक आपण करून बसलो, अशी कबुलीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पाश्चिमात्यांवरील आपल्या टीकेद्वारे देत असल्याचे दिसते. मात्र झेलेन्स्की यांनी कितीही टाहो फोडला तरी अमेरिका-नाटो युक्रेनमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करणार नाही, हे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे नो फ्लाय झोन लागू करून युक्रेनवर हल्ला चढविणारी रशियाची लढाऊ विमाने पाडण्याचा विचारही अमेरिका व नाटो करणार नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
केवळ युक्रेनचे लष्कर व जनतेला रशियाविरोधात शस्त्रसज्ज करून लढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिका व नाटो उत्सूक आहे. याद्वारे युक्रेनमधील युद्ध लांबविण्याची तयारी अमेरिकेने केल्याचे याआधीही उघड झाले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |