मॉस्को/किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतरही रशियन फौजा पुढे सरकल्या नव्हत्या. पण गुरुवारपासून रशियन फौजांनी किव्हच्या दिशेने आगेकूच सुरू केली. आत्तापर्यंत पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करणार्या रशियाने पश्चिम युक्रेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. अमेरिका व नाटोने युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये हजारो जवान तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तैनात केल्यानंतर, रशियाने युक्रेनमधील युद्धाची तीव्रता अधिकच वाढविल्याचे यामुळे समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशियन फौजांच्या हालचाली मंदावल्याचे दावे युक्रेन व पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत होते. रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांसह हजारो जवानांना मारल्याचे तसेच रशियाची लढाऊ विमाने व रणगाडे नष्ट केल्याचे सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आपल्या लष्कराच्या पराक्रमाची माहिती जगाला देत होते. याबरोबरच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा संघर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर आल्याचे दावे ठोकले होते. या पार्श्वभूमीवर रशियन लष्कराने पुन्हा एकदा आपल्या कारवाईचा वेग वाढविला आहे.
गुरुवारपासून युक्रेनची राजधानी किव्हनजिक असलेले रशियन रणगाडे व सैन्याचा ताफा पुढे सरकू लागला आहे. हा ताफा राजधानी किव्हच्या सीमेपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या आहेत. त्याचवेळी दुसर्या बाजूला रशियाने मध्य व पश्चिम युक्रेनमधील शहरांवर जबरदस्त हवाई हल्ले सुरू केले. शुक्रवारी मध्य युक्रेनमधील डिनिप्रो शहरावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले झाले असून यात कित्येक इमारती तसेच कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत.
रशियाने आतापर्यंत पश्चिम युक्रेनमध्ये हल्ले चढविले नव्हते. त्यामुळे युक्रेनमधील हा भाग तुलनेने अधिक सुरक्षित होता. पण युक्रेनला या भागाची सुरक्षा गृहित धरता येणार नाही, असा इशाराच रशियाने आपल्या लष्करी कारवाईद्वारे दिला आहे. याचा फार मोठा परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकतो. विशेषतः रशियाला आव्हान देण्याची भाषा करणार्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना याचा फार मोठा दणका बसू शकतो. अमेरिका व नाटोकडून मिळत असलेल्या लष्करी सहाय्यामुळे काही काळासाठी सामोपचाराचे सूर लावणार्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भाषा पुन्हा बदलली होती. त्या पार्श्वभूमीवर, रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिकच तीव्र केल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |