किव्हजवळील हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देशांनी रशियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली

- रशियाकडून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याचा इशारा

राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी

मॉस्को/किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हजवळ झालेल्या हत्याकांडाच्या मुद्यावरून युरोपिय देश रशियाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये जर्मनी व फ्रान्ससह सहा युरोपिय देशांनी १००हून अधिक राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी बुधवारी युरोपिय महासंघाकडून रशियाविरोधात अधिक कठोर निर्बंधांची घोषणा होईल, अशी माहिती फ्रान्सच्या मंत्र्यांनी दिली. युरोपिय देशांच्या राजनैतिक कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला आहे.

राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी

युक्रेनची राजधानी किव्हजवळील बुचा भागातून माघार घेण्याआधी रशियन सैनिकांनी इथे हत्याकांड घडविल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या हत्याकांडाचे काही फोटोग्राफ्स तसेच सॅटेलाईट छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर गदारोळ उडाला असून अमेरिका व युरोपिय देशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर पुन्हा एकदा युद्धगुन्हेगाराचा ठपका ठेवला आहे. युरोपिय देशांनीही बुचामधील घटना भयावह असल्याचे सांगून रशियावरील दडपण अधिक वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या २४ तासात जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वीडन, डेन्मार्क व लिथुआनियाने रशियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. जर्मनीने तब्बल ४० तर फ्रान्सने ३० अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. लिथुआनियाने रशियन राजदूतांना माघारी जाण्याचे निर्देश दिले असून राजनैतिक संबंध कमी करीत असल्याचे जाहीर केले आहे. युरोपमधील इतर देशांनीही येत्या २४ तासात रशियन अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचे संकेत दिले आहेत. युरोपिय देशांच्या या कारवाईविरोधात रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदेवेदेव्ह यांनी, युरोपिय देशांच्या राजनैतिक कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी

तर युक्रेनमधील कारवाईवरून रशियन राष्ट्राध्यक्षांवर युद्धगुन्हेगारीचा ठपका ठेवणार्‍या पाश्‍चिमात्य नेत्यांनी त्यांची विवेकबुद्धी तपासून घ्यावी, असा टोला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी लगावला आहे.

दरम्यान, किव्हजवळील काही भागांमधून रशियन फौजांनी घेतलेल्या माघारीनंतर उत्तर युक्रेनमधील काही भागांवर युक्रेनी लष्कराने ताबा मिळविल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण विभागाने केला. त्याचवेळी पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतात रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये जबरदस्त संघर्ष सुरू झाल्याचे समोर येत आहे. रशियाने मारिपोल व ओडेसा या दोन महत्त्वाच्या बंदरांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. मारिपोलच्या बहुतांश भागांमध्ये रशियन लष्कराने प्रवेश मिळविल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून देण्यात आली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info