वॉशिंग्टन/किव्ह – रशियन फौजा पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क प्रांतात मोठ्या आक्रमणाची तयारी करीत असल्याचा दावा अमेरिका व युक्रेनने केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी, रशियाची शेकडो लष्करी वाहने डोनेत्स्क प्रांतातील इझिअम शहराकडे जात असल्याचे समोर आले असल्याची माहिती दिली. तर पूर्व युक्रेनमध्ये लवकरच मोठ्या संघर्षाला सुरुवात होणार आहे, असे युक्रेनच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. दरम्यान, रशियान मारिपोलमध्ये रासायनिक हल्ला केल्याचा आरोप युक्रेन लष्करातील ‘अझोव्ह बटालियन’ने केला.
गेल्या आठवड्यात रशियाने किव्हसह युक्रेनच्या काही भागांमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली होती. या माहितीपाठोपाठ रशिया युक्रेनमधील मोहिमेची फेररचना करीत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्याला दुजोरा देणार्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. युक्रेन व अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आलेले दावेही त्याचाच भाग ठरतो.
रशियाकडून डोनेत्स्कमध्ये पाठविण्यात आणार्या तुकडीत, लष्करी जवानांची नेआण करणार्या गाड्यांबरोबरच रणगाडे व तोफांची वाहतूक करणारे ट्रक्स तसेच सशस्त्र वाहनांचा समावेश असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले. ‘रशियन तुकडी नक्की किती मोठी आहे याचा अंदाज आलेला नाही. मात्र रशिया डोनेत्स्कवर लक्ष्य केंद्रित करीत आहेत. नव्या हालचाली रशिया लष्करी मोहिमेची फेरआखणी करीत असल्याचे संकेत देतात’, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या संरक्षण विभागानेही याला दुजोरा दिला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, पूर्व युक्रेनमधील संघर्षावरून नवा इशारा दिला. पूर्व युक्रेनमध्ये युक्रेनी लष्कर रशियाला रोखण्यात अपयशी ठरले, तर रशियन फौजा पुन्हा किव्ह व नजिकच्या परिसरात हल्ले चढवू शकतात असे झेलेन्स्की यांनी बजावले. पूर्व युक्रेनबरोबरच मारिपोल ताब्यात घेण्यासाठीही निर्णायक हल्ला होऊ शकतो, अशी भीती युक्रेनी अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंतच्या संघर्षात मारिपोलमध्ये जवळपास १० हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक युक्रेनी अधिकार्यांनी दिली. या शहरात तैनात असलेल्या युक्रेनच्या अझोव्ह बटालियनने मारिपोलमध्ये रासायनिक हल्ला झाल्याचाही दावा केला आहे. मात्र रशियाने हा दावा फेटाळला आहे.
दरम्यान, नाटोच्या सदस्य देशांनी रशियन सीमेला जोडून असलेल्या इस्टोनियामध्ये लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. ‘बोल्ड ड्रॅगन’ असे नाव असलेल्या या सरावात ब्रिटन, फ्रान्स, नेदरलॅण्ड व इस्टोनियाचे दोन हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |