मॉस्को/किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याचा इशारा रशियाने दिला आहे. गुरुवारी रशियाने किव्हनजिक असलेल्या युक्रेनच्या मिसाईल फॅक्टरीला लक्ष्य केले होते. त्यानंतर हा नवा इशारा देण्यात आला आहे. किव्हनजिक केलेल्या हल्ल्याबरोबरच खार्किव्हमध्ये हल्ला केल्याचा तसेच युक्रेनचे ‘एमआय-८’ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, ‘ब्लॅक सी फ्लीट’चे नेतृत्त्व करणारी ‘मोस्कव्हा’ ही ‘मिसाईल क्रूझर शिप’ बुडाल्याची कबुली रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. युद्धनौकेवर लागलेल्या आगीमुळे ती बुडाल्याचा खुलासा रशियाकडून करण्यात आला.
अमेरिका व नाटो सदस्य देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा होत असून युद्ध अधिक काळ लांबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दुसर्या बाजूला रशियाने आपल्या लष्करी मोहिमेची फेरआखणी केली असून पूर्व व दक्षिण युक्रेनवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र फेरआखणी करताना युक्रेनमधील इतर भागांकडे दुर्लक्ष होणार नाही, असा संदेश रशियाने नव्या हल्ल्यांमधून दिला आहे. गुरुवारी राजधानी किव्ह, खार्किव्ह तसेच इतर भागांमध्ये हल्ले करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली. त्याचवेळी क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याचाही इशारा दिला.
राजधानी किव्हनजिक असलेल्या ‘विझार मिसाईल फॅक्टरी’वर कॅलिबर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात फॅक्टरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा रशियाने केला आहे. या फॅक्टरीत युक्रेन मध्यम तसेच दीर्घ पल्ल्याची जहाजभेदी तसेच विमानभेदी क्षेपणास्त्रे तयार करीत होता, असेही रशियाने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी रशियाच्या युद्धनौकेवर याच फॅक्टरीत तयार झालेल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचेही सांगण्यात येते.
खार्किव्ह भागातही मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलंडच्या खाजगी लष्करी कंपनीच्या पथकाला लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला. हल्ल्यात ३० जणांचा बळी गेल्याची माहिती रशियाने दिली. रशियाने युक्रेनमध्ये दुसर्या देशाच्या पथकावर मोठा हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जाते. युक्रेन अथवा पोलंडने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. चेर्निगव्ह प्रांतात युक्रेनचे ‘एमआय-८’ हेलिकॉप्टर पाडल्याची माहिती रशियाने दिली. या हेलिकॉप्टरने रशियाच्या ब्रिआंस्क प्रांतात हल्ला चढविला होता, असेही रशियाने सांगितले.
गुरुवारी चढविलेल्या या हल्ल्यांची माहिती देतानाच रशियाने नव्या हल्ल्यांचा इशारा दिला. ‘युक्रेनमधून रशियावर दहशतवादी हल्ले झाले किंवा युक्रेन फौजांनी घातपाताचा प्रयत्न केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल. रशिया राजधानी किव्ह व नजिकच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल’, असे रशियाच्या संरक्षण विभागाने बजावले. हल्ल्यांचे इशारे देतानाच ‘मोस्कव्हा’ ही ‘मिसाईल क्रूझर शिप’ बुडाल्याची कबुलीही रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. ब्लॅक सी सागरी क्षेत्रात सक्रिय असताना युद्धनौकेवर अचानक आग लागली होती. त्यानंतर दुरुस्तीसाठी जवळच्या तळावर नेत असताना युद्धनौका बुडाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.
युक्रेनच्या संरक्षण विभागाने, रशियाची युद्धनौका क्षेपणास्त्र हल्ल्यात बुडविल्याचा दावा केला होता. ‘मोस्कव्हा’ला ओडेसाजवळ तैनात असणार्या नेपच्यून क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने लक्ष्य करण्यात आल्याचे युक्रेनने आपल्या दाव्यात म्हटले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |