किव्ह – मारिओपोलनंतर युक्रेनचे आणखी एक शहर रशियन सैन्याच्या हाती पडण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. सेव्हेरोडोनेत्स्क शहरात रशियन सैन्य घुसू लागले आहे. इथे तैनात असलेल्या युक्रेनी जवानांना लिशिचास्कच्या दिशेने पिटाळण्याच्या योजनेवर रशियन सैन्य काम करीत आहे. सेव्हेरोडोनेत्स्कमधील परिस्थिती बिकट असल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही मान्य केल्याच्या बातम्या येत आहेत. तर नाटोने थेट सहाय्य पुरविल्याखेरीज युक्रेनचे लष्कर रशियन सैन्यासमोर टिकाव धरू शकत नाही, असे युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जेोसेफ बोरेल यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, युक्रेनचे लष्कर मोठ्या धैर्याने रशियाला तोंड देत असल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनी केले होते. हे युद्ध जितके लांबेल, तितक्याच प्रमाणात रशियाचीअवस्था बिकट बनेल, असे पाश्चिमात्य माध्यमांसह काही सामरिक विश्लेषक देखील सांगत होते. पण हे दावे पूर्णपणे निकालात निघाले असून रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांचा ताबाघेत आगेकूच करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मारिओपोल शहर ताब्यात घेतल्यानंतर, युक्रेनच्या इतर महत्त्वाच्या शहरांकडे रशियन सैन्याने लक्ष केेंद्रीत केले आहे. यासाठी अतिरिक्त शस्त्रास्त्रे आणि लष्करी तुकड्या रशियाने पाठविल्या आहेत.
सेव्हेरोडोनेत्स्क शहरात रशियाचे सैनिक घुसू लागले असून लवकरच मारिओपोलप्रमाणे या शहराचाही ताबा रशिया घेईल, असे दावे केले जातात. यामुळे रशियाला रोखण्याची ताकद युक्रेनी लष्कराकडे उरलेली नाही, ही बाब आणखीएकवार सिद्ध होत आहे. इथे रशियन सैन्याशी लढणे अधिकाधि अवघड बनत चालल्याची कबुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. रशियन तोफांच्या माऱ्यामुळे या शहरांमधल्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. इतकेच नाही तर या शहरांमधील 90 टक्क्यांहून अधिक इमारतींची नासधूस झाली आहे, अशी हताश प्रतिक्रिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.
युक्रेनची ही अवस्था लक्षात घेता, नाटोला रशियाविरोधात युक्रेनला अधिक सहाय्य पुरवावे लागेल, असे युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी म्हटले आहे. मात्र कुठल्याही देशाने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली तर त्याचे गंभीर परिणाम झाल्यावाचून राहणार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिले आहेत. त्यामुळे नाटोच्या युक्रेनला पुरविण्या येणाऱ्या सहाय्यावर फार मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे युक्रेनच्या युद्धाचे पारडे रशियाच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहे. आणखी काही आठवडे अशीच परिस्थिती राहिली तर युक्रेनचा काही भूभाग रशिया आपल्या ताब्यातघेईल, अशी दाट शक्यता समोर येत आहे. रशियन सैन्य या योजनेनुसार युक्रेनमध्ये आगेकूच करीत असल्याचे आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |