रशियाला डोन्बासमध्ये जबरदस्त सामरिक यश मिळत आहे

- ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचा दावा

सामरिक यश

लंडन/मॉस्को/किव्ह – रशियाच्या युक्रेनमधील लष्करी कारवाईला 100 दिवस पूर्ण होत असतानाच रशियन फौजांनी डोन्बास क्षेत्रातील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाच्या या आक्रमकतेची दखल पाश्चिमात्य देशांनाही घेणे भाग पडले आहे. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने, रशियाला डोन्बास क्षेत्रात जबरदस्त सामरिक यश मिळत असल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी येत्या दोन आठवड्यात लुहान्स्क प्रांत पूर्णपणे रशियन नियंत्रणाखाली असेल, असाही दावा केला. या पार्श्वभूमीवर, युक्रेनमधील कारवाईची उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत रशिया आपली लष्करी मोहीम सुरू ठेवेल, असे रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले आहे.

गेल्या 24 तासात रशियाने डोन्बासमधील सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क शहरातील युक्रेनी फौजांच्या आघाडीवर मोठे हल्ले चढविले आहेत. रशियन फौजांकडून सातत्याने तोफा, रणगाडे, रॉकेट्सचा मारा करण्यात येत असून काही भागांमध्ये हवाईहल्ल्यांचाही वापर झाल्याचे सांगण्यात येते. डोनेत्स्क प्रांतातील 14 शहरे व गावांवर एकाच वेळी हल्ले करण्यात आले. यात स्लोव्हिआन्स्क व बाखमत या मोक्याच्या शहरांचा समावेश आहे. स्लोव्हिआन्स्कमधील पाणी तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. डोन्बास क्षेत्रात रशियाने ‘आर्टिलरी’ व ‘रॉकेट फोर्सेस’च्या नव्या तुकड्या तैनात केल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

सामरिक यश

रशियाच्या या घणाघाती हल्ल्यांनी युक्रेनचे लष्कर जेरीस आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांमधून समोर आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की तसेच लुहान्स्क व डोनेत्स्कमधील युक्रेनी अधिकारी सातत्याने मोठी जीवित तसेच वित्तहानी होत असल्याचे सांगत आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दररोज 60 ते 100 जवान गमवावे लागत असल्याबाबत दिलेली कबुली लक्ष वेधून घेणारी ठरली होती. आता युक्रेनबरोबरच त्याला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांमधूनही चिंतेचे सूर उमटू लागले आहेत.

सामरिक यश

काही दिवसांपूर्वी अमेरिकन यंत्रणा तसेच अधिकाऱ्यांनी युक्रेनला डोन्बासमधील रशियाच्या कारवाईबाबत इशारा दिला होता. त्यानंतर आता ब्रिटनच्या यंत्रणांनी उघड शब्दात रशियाला डोन्बासमध्ये यश मिळत असल्याचे मान्य केले आहे. युक्रेनच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, रशियाला डोन्बासमधील कारवाईत जबरदस्त यश मिळत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. ‘रशियन लष्कराच्या मोहिमेने वेग पकडला असून तो कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सध्या रशियन फौजा युक्रेनी लष्करावर भारी पडत असल्याचे दिसत आहे. लुहान्स्कमधील 90 टक्के भागावर रशियाने ताबा मिळविला आहे व येत्या दोन आठवड्यात ते या प्रांतावर पूर्णपणे ताबा मिळवतील’, असे ब्रिटनच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनमधील कारवाईची सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत रशिया आपली लष्करी मोहीम सुरू ठेवेल, असे रशियन सरकारचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी बजावले. डोन्बासमधील जनतेची सुरक्षा हे रशियाच्या कारवाईमधील प्रमुख उद्दिष्टांपैकी एक होते व त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत, असे रशियन प्रवक्त्यांनी पुढे सांगितले. तर युक्रेनचे युद्ध आता थांबायलाच हवे व या युद्धात कोणीही जिंकणार नसल्याचे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info