मॉस्को/किव्ह – रशियन संरक्षणदलांनी गेल्या काही दिवसात क्षेपणास्त्रहल्ल्यांची तीव्रता वाढविल्याचा दावा युक्रेनने केला. गेल्या चार दिवसांच्या अवधीत रशियाने युक्रेनवर तब्बल 130 क्षेपणास्त्रे डागल्याचे युक्रेनचे लष्करप्रमुख वॅलरी झॅलुझ्निय यांनी सांगितले. यात क्रूझ, बॅलिस्टिक तसेच सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात युक्रेनची मोठ्या प्रमाणात हानी होत असून हल्ल्यांची तीव्रता कायम राहिल्यास युक्रेनची अधिकच कोंडी होऊ शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, युद्धात गमावलेला भाग युक्रेन परत मिळविण्यात यशस्वी ठरणार नाही असा मतप्रवाह बायडेन प्रशासनातील अधिकारी व्यक्त करीत असल्याचे वृत्त आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिले आहे.
मारिपोल व सेव्हेरोडोनेत्स्कवर मिळविलेल्या नियंत्रणानंतर रशियन संरक्षणदलांची आक्रमकता अधिक वाढत असल्याचे समोर येत आहे. डोन्बासमधील भागांवर एकापाठोपाठ मिळत असलेला ताबा आणि राजधानी किव्हपासून ते ओडेसापर्यंत सुरू झालेले नवे क्षेपणास्त्रहल्ले याला दुजोरा देणारे ठरतात. युक्रेनला समर्थन देणारे व मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करणारे ब्रिटन तसेच अमेरिकेसारखे देशही याला दुजोरा देत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तसेच अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाला डोन्बासमध्ये यश मिळत असून त्यांचे लष्कर आगेकूच करीत असल्याची कबुली दिली.
आता युक्रेनचे वरिष्ठ अधिकारीही रशियाच्या वाढत्या आक्रमकतेबाबत उघड वक्तव्ये करीत आहेत. युक्रेनचे लष्करप्रमुख वॅलरी झॅलुझ्निय, अंतर्गत सुरक्षामंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांनी रशियन क्षेपणास्त्रहल्ल्यांच्या वाढत्या व्याप्तीसंदर्भात माहिती दिली. ‘चार दिवसांपूर्वी रशियाने 53 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली होती. तीन दिवसांपूर्वी 26 तर दोन दिवसांपूर्वी 40 क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. गेल्या 24 तासांमध्ये 12 क्षेपणास्त्रहल्ले करण्यात आले आहेत’, असे लष्करप्रमुख वॅलरी झॅलुझ्निय यांनी सांगितले. अंतर्गत सुरक्षामंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांनी रशियाने गेल्या काही दिवसात 100हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याची कबुली दिली. रशिया वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे वापरत असल्याचे युक्रेनच्या हवाईदलाकडून सांगण्यात आले.
रशियाकडून युक्रेनवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये ‘कॅलिबर’, ‘केएच-22′, ‘केएच-59′ तसेच ‘टोश्का-यु’ या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसात राजधानी किव्ह, खार्किव्ह, क्रेमेन्चुक, मायकोलेव्ह तसेच ओडेसामध्ये या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. त्याचवेळी डोन्बासमधील विविध शहरांवरही क्षेपणास्त्रे डागण्यात येत आहेत. लुहान्सकमधील लिशिचान्स्कवर एकाच वेळी दोन बाजूंनी हल्ला चढविण्यात आल्याचे स्थानिक युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |