तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे विनाशकारी युद्धाची सुरूवात

- ब्रिटनमधील चीनच्या राजदूतांचा इशारा

लंडन – ‘चीनला रोखण्यासाठी अमेरिका तैवान कार्डचा वापर करीत आहे आणि तैवानमधील सत्ताधारी चीनचा अधिकार नाकारून स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत आहेत. अमेरिका व तैवानच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विघटनवादी शक्तींना त्यांच्या चुकांची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. चीनची जनता सार्वभौमत्व व क्षेत्रिय एकजुटीच्या मुद्यावर कधीही तडजोड करणार नाही. तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण असून हे युद्ध त्यांना विनाशाकडे घेऊन जाईल’, असा इशारा ब्रिटनमधील चीनचे राजदूत झेंग झेगुआंग यांनी दिला. ब्रिटीश दैनिकात लिहिलेल्या एका लेखात चीनच्या राजदूतांनी ही धमकी दिली. ब्रिटनने अमेरिकेच्या मागे जाऊन तैवान मुद्यावर ‘रेड लाईन्स’ ओलांडण्याचे धाडस करु नये, असे राजदूत झेगुआंग यांनी या लेखात बजावले आहे. बुधवारी चीनच्या संरक्षणमंत्र्यांनीही ‘स्वतंत्र तैवान’साठी सुरू असलेल्या प्रयत्नांची अखेर वाईटच असेल, असे धमकावले होते.

तैवानचे स्वातंत्र्य

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवान दौऱ्यावर दाखल झाले होते. या भेटींच्या आधी तसेच त्यानंतर अमेरिकेने तैवानला संरक्षणसहाय्य तसेच इतर क्षेत्रांमधील सहकार्याबाबत घोषणा केल्या होत्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने युद्धसराव व इतर माध्यमांमधून तैवानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी तैवानला पाठिंबा देणाऱ्या देशांनाही चीन धमकावत आहे. ब्रिटनमधील चिनी राजदूतांनी लेखातून दिलेला इशाराही त्याचाच भाग दिसतो.

तैवानचा मुद्दा हा आता चीन व अमेरिका-ब्रिटनमधील कळीचा मुद्दा बनला आहे. पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर या देशांमधील संबंध नाजूक वळणावर पोहोचले आहेत. या मुद्यावर कोणत्याही देशाने चूक करता कामा नये, याकडे झेगुआंग यांनी लेखात लक्ष वेधले. अमेरिका व तैवानमधील विघटनवादी शक्तींकडून देण्यात येणाऱ्या चिथावण्यांना प्रत्युत्तर देणे ही चीनसाठी नैसर्गिक बाब ठरते. हे प्रत्युत्तर अमेरिकेने चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप टाळावा यासाठी आवश्यक आहे. तैवानच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या गटांनाही यामुळे आळा बसेल, असा दावाही चिनी राजदूतांनी केला. अमेरिकेने तैवान कार्डचा वापर करणे सोडून ‘वन चायना पॉलिसी’ला पूर्ण मान्यता द्यावी आणि नव्या समस्या निर्माण करणे टाळावे, असेही झेगुआंग यांनी बजावले. यावेळी त्यांनी ब्रिटनलाही तैवानच्या मुद्यावरून फटकारले.

तैवानचे स्वातंत्र्य

‘तैवानचा मुद्दा हा ब्रिटन व चीनमध्ये नेहमीच संवेदनशील विषय ठरला आहे. ब्रिटनने तैवानबाबतची चीनच्या राजवटीची भूमिका मान्य केल्यानंतरच दोन देशांमध्ये संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. ब्रिटनने त्याकडे दुर्लक्ष करून अमेरिकेचे अनुकरण करु नये. तैवानच्या संरक्षणासाठी सहाय्य पुरविण्याची आश्वासने व त्यासंदर्भातील हालचाली बेजबाबदार वर्तन ठरते. ब्रिटनने वन चायना धोरणाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास व तैवानच्या मुद्यावर रेड लाईन ओलांडल्यास द्विपक्षीय सहकार्यावर गंभीर परिणाम होतील. याबाबत ब्रिटनने कोणतीही चूक करु नये’, असा इशारा चिनी राजदूतांनी दिला.

ब्रिटनला दिलेल्या इशाऱ्यामागे सत्ताधारी पक्षाच्या नेत्या व परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांचे उद्गार कारणीभूत असल्याचे मानले जाते. पेलोसी यांच्या भेटीनंतर चीनकडून तैवाननजिकच्या क्षेत्रात सुरू असणाऱ्या कारवाया शांतता व स्थैर्यासाठी धोकादायक असल्याचे टीकास्त्र ट्रुस यांनी सोडले होते. ब्रिटनच्या वरिष्ठ संसद सदस्यांनी तैवानला भेट देण्याचे संकेत दिले आहेत. ही बाब चिनी सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडली नसल्याचे राजदूत झेगुआंग यांच्या उद्गारांवरून स्पष्ट होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info