युक्रेनचे युद्ध अधिक लांबल्यास त्यावर तोडगा निघणे अवघड बनेल

- संयुक्त राष्ट्रसंघातील रशियन प्रतिनिधींचा इशारा

तोडगा

मॉस्को – पाश्चिमात्य देश रशियाची अधिकाधिक हानी व्हावी यासाठी युक्रेनमधील युद्ध लांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जितका काळ हे युद्ध लांबेल, त्याच प्रमाणात त्यावर तोडगा निघण्याची शक्यताही कमी होत जाईल, असा इशारा रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील प्रतिनिधी गेनाडी गॅटिलोव्ह यांनी दिला. हा इशारा देत असताना, सध्या रशिया व युक्रेनदरम्यान राजनैतिक चर्चेची शक्यता दिसत नसल्याचेही गेनाडी यांनी स्पष्ट केले. रशियन अधिकारी राजनैतिक चर्चेची शक्यता फेटाळत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशियासाठी नव्या ‘रेड लाईन’चा उल्लेख करीत धमकावले आहे. युक्रेनी युद्धकैद्यांवर खटले दाखल करून कायदेशीर कारवाई केल्यास वाटाघाटीचे मार्ग पूर्णपणे बंद होतील, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

तोडगा

रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण होत असून दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. रशियाकडून ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हपासून ते दक्षिण युक्रेनमधील ओडेसापर्यंत सर्वच आघाड्यांवर जबरदस्त मारा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेनने दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआ, खेर्सन, मायकोलेव्हसह क्रिमिआ प्रांतावरही प्रतिहल्ल्यांचे सत्र चालू केले आहे. या वाढत्या संघर्षामुळे सध्या शांतीचर्चा अथवा तोडग्यांचा पर्याय पूर्णपणे मागे पडला आहे. रशियन अधिकारी व नेते लष्करी मोहिमेची उद्दिष्टे विस्तारल्याची वक्तव्ये करीत आहेत. तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी क्रिमिआ ताब्यात घेतल्याशिवाय युद्ध थांबविणार नसल्याचे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा महत्त्वाचा ठरतो. ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे प्रतिनिधी गेनाडी यांनी, वाटाघाटींच्या मार्गाने युद्धावर तोडगा निघणे अशक्य असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. ‘यापूर्वी मार्च महिन्यात रशिया व युक्रेनमध्ये शांतीचर्चा यशस्वी ठरण्याची शक्यता दिसली होती. मात्र पाश्चिमात्य देशांना अखेरचा युक्रेनी नागरिक जिवंत असेपर्यंत संघर्ष सुरू ठेवायचा आहे. पण रशिया-युक्रेन संघर्ष जितका काळ लांबत जाईल, त्या प्रमाणात त्यावर तोडगा निघणे अधिकाधिक कठीण होईल’, असा इशारा रशियन प्रतिनिधींनी दिला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी रशिया व युक्रेनमधील चर्चेचा मार्ग खुला ठेवण्यासाठी प्रयत्न केले, असा दावाही त्यांनी केला.

तोडगा

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाबरोबरील चर्चेसाठी नव्या ‘रेड लाईन’चा इशारा दिला. रशियाने युक्रेनचे हजारो जवान पकडून त्यांना युद्धकैदी बनविले आहे. या युद्धकैद्यांवर खटले दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यास युक्रेनबरोबरील वाटाघाटींचा मार्ग पूर्णपणे बंद होईल, याची रशियाने जाणीव ठेवावी, असे झेलेन्स्की यांनी बजावले.

रशियाने गेल्या 24 तासात ओडेसा, झॅपोरिझिआ तसेच मायकोलेव्ह प्रांतात क्षेपणास्त्रे तसेच रॉकेट्सचा जबरदस्त मारा केला. ओडेसा प्रांतात पाच कॅलिबर क्षेपणास्त्रे डागण्यात आली व पाश्चिमात्य देशांचा शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला, अशी माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. तर खेर्सन व मायकोलेव्हच्या सीमेवरील एक शहर ताब्यात घेण्यात रशियन फौजांना यश मिळाले आहे. डोनेत्स्क प्रांत तसेच खेर्सन भागात रशियाकडून सातत्याने तोफा व रॉकेट्सचा मारा होत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info