झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाच्या मुद्यावरून रशियाने संयुक्त राष्ट्रसंघटनेतील अण्वस्त्रप्रसारबंदी ठराव रोखला

अण्वस्त्रप्रसारबंदी

न्यूयॉर्क/मॉस्को – युक्रेनच्या झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावरून रशिया व युक्रेनमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच रशियाने या मुद्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेत अण्वस्त्रांच्या मुद्यावर सुरू असलेल्या बैठकीदरम्यान, अण्वस्त्रप्रसारबंदी करारासंदर्भात ठराव मांडण्यात आला होता. मात्र रशियाने त्यावर आक्षेप घेत ठराव मंजूर होण्यापासून रोखला. सदर ठरावात युक्रेनमधील अणुप्रकल्प व रशियाच्या हस्तक्षेपाचा उल्लेख करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतल्याचे रशियाने स्पष्ट केले.

अण्वस्त्रप्रसारबंदी

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची अण्वस्त्रप्रसारबंदीच्या मुद्यावर बैठक सुरू आहे. अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर चर्चा घडून एकमत व्हावे हा या परिषदेचा उद्देश आहे. परिषदेच्या अखेरीस कराराच्या मुद्यावर संयुक्त ठराव मंजूर करण्यात येणार होता. या ठरावात, युक्रेनच्या झॅपोरिझिआ अणुऊर्जा प्रकल्पात रशियाने केलेली लष्करी तैनाती तसेच प्रकल्पाचा ताबा युक्रेनकडे नसणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला. हा उल्लेख राजकीय असल्याचे सांगून रशियन प्रतिनिधींनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

आक्षेप घेतानाच ठरावाला आपली मान्यता नसल्याचे रशियाने जाहीर केले. रशिया हा स्थायी सदस्य देशांपैकी एक असल्याने त्याच्या विरोधामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही. रशियाच्या या भूमिकेवर अमेरिका, जपान तसेच ऑस्ेलियाने नाराजी व्यक्त केली. ठरावावर एकमत न होऊ शकल्याच्या मुद्यावर चीनने नाराजी व्यक्त केल्याचेही समोर आले आहे. 1970 साली मांडण्यात आलेल्या अण्वस्त्रप्रसारबंदी कराराला जवळपास 190 देशांनी समर्थन दिले असले तरी त्यातील सुधारणांबाबत एकमत होऊ शकलेले नाही. रशियाने झॅपोरिझिआवरून घेतलेला आक्षेप त्याचाच भाग ठरतो.

अण्वस्त्रप्रसारबंदी

झॅपोरिझिआ अणुऊर्जाप्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. युक्रेनने गेल्या महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

गेल्या आठवड्यात गुरुवारी अणुप्रकल्पाजवळ असणाऱ्या कोळशाच्या क्षेत्रांना आग लागली. या आगीमुळे अणुप्रकल्पाचा नॅशनल ग्रिडशी असलेला संपर्क तोडणे भाग पडले. यामुळे प्रकल्प बंद पडण्याचा धोकाही निर्माण झाला होता. असे झाल्यास प्रकल्पातून आण्विक व किरणोत्सर्गी घटकांचे उत्सर्जन होण्याचा धोका होता. मात्र काही काळाने प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात आला व शुक्रवारी प्रकल्पाचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा या प्रकल्पानजिक हल्ले झाल्याचे आरोप रशिया व युक्रेन या दोन्ही देशांनी केले आहेत. प्रकल्प हाताळणाऱ्या युक्रेनियन कंपनीने पुढील काही दिवसात कधीही किरणोत्सर्गी घटकांची गळती होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

हिंदी     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info