मॉस्को/किव्ह – खार्किव्हमध्ये पिछेहाट झाल्यानंतर रशियन फौजांनी सुरू केलेल्या घणाघाती हल्ल्यांचे सत्र कायम ठेवले आहे. गेल्या 24 तासात रशियाने खार्किव्हसह डोन्बास क्षेत्र तसेच दक्षिणेतील मायकोलेव्ह भागात मोठे हल्ले चढविले. डोन्बास क्षेत्रात युक्रेनला सहाय्य करणाऱ्या अमेरिकेच्या खाजगी कंत्राटी जवानांसह परदेशी तुकड्यांना लक्ष्य केल्याची माहिती रशियन संरक्षणदलाने दिली. तर मायकोलेव्ह प्रांतात पिव्हडेनोक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्पानजिक क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल मार्क मिले यांनी, नजिकच्या काळात रशियाकडून होणारे हल्ले अधिक प्रखर असू शकतात, असे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी युक्रेनी लष्कराने खार्किव्हमध्ये चढविलेल्या प्रतिहल्ल्यांमध्ये रशियाचे नुकसान झाले होते. रशियन लष्करी तुकड्यांना माघारही घ्यावी लागली होती. रशियन लष्कराच्या या माघारीचे रशियासह आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही याची दखल घेतली. ‘रशियन फौजांवर अधिक दडपण आणण्याचा प्रयत्न झाला तर रशिया पुढील काळात अधिक आक्रमक व जबर हल्ले करेल’, असे पुतिन यांनी बजावले होते. राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमध्ये घणाघाती हल्ल्यांचे सत्र सुरू केले होते.
गेले तीन दिवस रशियन फौजा सातत्याने युक्रेनी शहरे, लष्करी तळ, पायाभूत सुविधा व शस्त्रसाठ्यांवर हल्ले करीत आहे. यात रशियाला माघार घ्यावी लागलेल्या खार्किव्ह प्रांताचाही समावेश आहे. खार्किव्हमधील वीजप्रकल्पासह इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. दुसऱ्या बाजूला डोन्बास प्रांतात मंद गतीने सुरू असणाऱ्या मोहिमेलाही रशियाने वेग दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने क्रॅमाटोर्स्क तसेच बाखमतजवळील भागांवर हवाई तसेच क्षेपणास्त्रहल्ले चढविले.
या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या खाजगी कंत्राटी जवानांच्या तळाला लक्ष्य करण्यात आले. हा तळ ‘कॉन्स्टेलिस प्रायव्हेट सिक्युरिटी ग्रुप’चा होता, असा दावा करण्यात आला. तसेच परदेशी जवानांच्या तुकडीवर हल्ला चढवून त्यांचे मोठे नुकसान केल्याची माहितीही रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. डोन्बास क्षेत्रातील 120 जागांवर हल्ले चढविल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. त्याचवेळी दक्षिण युक्रेनमध्ये खेर्सन तसेच मायकोलेव्ह प्रांतातही रशियाने जबर हल्ले केले आहेत.
मायकोलेव्हमध्ये रशियन फौजांनी पिव्हडेनोक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्पानजिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला. युक्रेनच्या संरक्षण विभागाने याचे काही फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला. अणुप्रकल्पापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर क्षेपणास्त्र कोसळल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियाचे हे कृत्य दहशतवादाचा भाग ठरतो, असा ठपकाही युक्रेनी यंत्रणांनी ठेवला आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पूर्ण युक्रेनवर ताबा मिळविल्याशिवाय युक्रेनच्या फौजा थांबणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |