पाश्चिमात्य देशांनी मर्यादेबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तर रशिया स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करील

- माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारा

रशिया

मॉस्को – पाश्चिमात्य देशांनी रशियाला मर्यादेबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्यास स्वसंरक्षणासाठी रशिया युक्रेनविरोधात अण्वस्त्रांचा वापर करील, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदव्ह यांनी दिला. ‘युक्रेनवर अणुहल्ला केल्यास अमेरिका व नाटो त्याला प्रत्युत्तर देणार नाहीत कारण त्यांना आण्विक विनाशाची भीती आहे. अमेरिका व ब्रिटन अण्वस्त्रांच्या मुद्यावर रशियाला धमकावण्यावाचून काहीही करु शकत नाहीत’, असा टोलाही मेदवेदेव्ह यांनी लगावला. मेदवेदेव्ह अणुहल्ल्याचा इशारा देत असतानाच, तुर्कीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनबरोबरील चर्चेसाठी तयार असल्याचा दावा केला आहे.

अण्वस्त्रांचा वापर करील

युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांमुळे खार्किव्हमधून रशियन फौजांना माघार घ्यावी लागली होती. मात्र त्यानंतर रशिया अधिकच आक्रमक झाला असून हल्ल्यांची तीव्रताही वाढविली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही अधिक कठोर भूमिका स्वीकारली असून अणुहल्ल्याचा इशारा देतानाच नव्या तैनातीच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. त्याचवेळी युक्रेनमधील जिंकलेला भाग रशियाला जोडण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सार्वमताचे निकाल लवकरच घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, युक्रेननेही रशियाने नियंत्रण मिळविलेल्या भागातील जास्तीत जास्त भाग ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे.

रशियाने युक्रेनच्या डोन्बास क्षेत्राचा भाग असलेल्या लुहान्स्क व डोनेत्स्कसह खेर्सन तसेच झॅपोरिझिआवर ताबा मिळविला आहे. हा भाग रशियाला जोडल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रे तैनात करण्याचे संकेत रशियन राजवटीने दिले होते. त्यावर अमेरिकेने तीव्र परिणामांचा इशारा दिला होता. पण मेदवेदेव्ह यांनी हा इशारा धुडकावत अणुहल्ल्याच्या धमकीचा पुनरुच्चार केला आहे. ‘रशियाला असलेला धोका मर्यादेच्या पलिकडे गेला व रशियाच्या अस्तित्वावर संकट आले तर युक्रेनविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी आम्ही कचरणार नाही’, अशी धमकी मेदवेदेव्ह यांनी दिली.

अण्वस्त्रांचा वापर करील

‘फक्त स्वतःचेच ऐकू येणाऱ्या बहिऱ्या कानांना मी आठवण करून देतो. आवश्यकता भासल्यास रशियाला अण्वस्त्रे वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. रशियाच्या धोरणांना अनुसरून व गरज असल्यास पूर्वनिर्धारित घटनांमध्ये अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’, असे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदव्ह यांनी बजावले. आपले वक्तव्य पोकळ नाही, याची जाणीव ठेवा असेही मेदवेदेव्ह पुढे म्हणाले. युक्रेनवर अणुहल्ला झाल्यास नाटो आघाडी त्यावर प्रतिसाद देण्याची शक्यता नाही, कारण या देशांना आण्विक विनाशाची भीती आहे असा दावाही रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनच्या राजवटीबरोबर पुन्हा चर्चा सुरू करण्यास तयार आहेत, असे तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. पुतिन व तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्यात ‘एससीओ’च्या बैठकीदरम्यान यासंदर्भात बोलणी झाल्याचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावुसोग्लू यांनी म्हटले आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. पुतिन यांनी वाटाघाटींसाठी रशिया तयार असल्याचे सांगितले होते, असा खुलासा पेस्कोव्ह यांनी केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info