इरबिल – आपल्या देशात भडकलेल्या हिंसाचारासाठी इराकमधील कुर्द संघटना जबाबदार असल्याचा ठपका ठेवून इराणने कुर्दिस्तान प्रांतावरील हल्ले सुरू ठेवले आहेत. इराण या हल्ल्यांची तीव्रता वाढवित असून यामध्ये निरपराध कुर्दवंशियांचा बळी जात असल्याची टीका कुर्द नेते करीत आहेत. दरम्यान, इराणचे इराकवर हल्ले सुरू असताना अमेरिकेच्या विशेषदूतांनी इराकच्या कुर्दिस्तान प्रांताचे पंतप्रधान मसरूर बर्झानी यांची भेट घेऊन चर्चा केली. इराणच्या या हल्ल्यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून अमेरिकेचे सिनेटर्स हे हल्ले रोखण्यासाठी इराणवर दडपण वाढविण्याची मागणी करीत आहेत.
माहसा अमिनी या 22 वर्षी कुर्द तरुणीच्या संशयास्पदरित्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठे आंदोलन भडकले आहे. माहसाचे कारण करून कुर्द संघटनांनी इराणमध्ये हिंसाचार भडकविल्याचा आरोप इराण करीत आहे. याला अमेरिका, इस्रायलकडून समर्थन मिळत असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. त्याचबरोबर सुरुवातीला इराणमधील कुर्दांवर कारवाई केल्यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इराकच्या कुर्दिस्तानवर रॉकेट्स, क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सचे हल्ले सुरू केले होते. इराकमधील कुर्द इराणमधील कुर्दवंशियांच्या मागे असून त्यांच्या संगनमताने इराणमधील आंदोलनांला बळ पुरविले जात असल्याचे इराणचे म्हणणे आहे. म्हणूनच इराण इराकमधील कुर्दवंशियांना धडा शिकविण्यासाठी हे हल्ले चढवित आहे.
गेल्या बुधवारी इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये 18 जणांचा बळी गेला असून 58 जण जखमी झाले होते. तर सहा दिवसांपूर्वी रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या 14 जणांमध्ये अमेरिकन महिलेचाही समावेश होता. इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील या कारवाईवर अमेरिकेने टीका केली होती. इराणच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याचा पूर्णपणे बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत हे हल्ले सुरू ठेवण्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सने जाहीर केले होते.
तर दोन दिवसांपूर्वी इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रांताच्या सीमेजवळील सैन्यतैनाती वाढविली आहे. त्याचबरोबर इराणने इराकच्या सीमेजवळ रॉकेट लाँचर्स तैनात केल्याच्या बातम्याही येत आहेत. कुर्दांवरील कारवाई तीव्र करण्यासाठी इराणने या लष्करी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जातो. तर इराण कुर्दांवरील रोषामुळे निरपराध कुर्दवंशियांचा बळी घेत असल्याची टीका कुर्द नेते करीत आहेत. इराणच्या या हल्ल्याविरोधात कुर्दांना अमेरिकेचीही साथ मिळू लागली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या प्रकरणी नियुक्त केलेली विशेषदूत निकोलस ग्रँगर यांनी बुधवारी इराकच्या कुर्दिस्तान प्रांताला भेट दिली. स्वायत्त कुर्दिस्तान प्रांताचे पंतप्रधान मसरूर बर्झानी यांनी विशेषदूत ग्रँगर यांची भेट घेऊन इराणमधून होणाऱ्या हल्ल्यांवर टीका केली. इराक तसेच सिरियातील कुर्दांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत चर्चा पार पडली असून याप्रकरणी अमेरिका कुर्दांशी सहकार्य करील, असे बर्झानी यांच्या कार्यालयाने जाहीर केले. तसेच इराक, सिरियातील कुर्दांना एकत्र आणून या भागात स्वातंत्र्याची मोठी राजकीय चळवळ उभारण्यावर चर्चा झाल्याचे बर्झानी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इराक, इराण, सिरिया, तुर्की आणि आर्मेनियामध्ये विभागलेल्या कुर्दांचा स्वतंत्र देश असावा, अशी मागणी गेली सात दशके केली जात आहे. पाश्चिमात्य देशांनी आत्तापर्यंत कुर्दांचा स्वत:च्या हितासाठी वापर करून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. पण इराणकडून कुर्दांवर कारवाई सुरू झाल्यानंतर बायडेन प्रशासनाने कुर्दांबाबत स्वीकारलेले धोरण लक्षवेधी ठरत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |