वॉशिंग्टन/लंडन – रशिया-युक्रेन संघर्षाची वाढती तीव्रता व पोलंडमधील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह नाटोने युरोपमधील आपली लष्करी तैनाती अधिकाधिक वाढविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाटो सदस्य देशांच्या पाच विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्स’सह युरोपच्या सागरी क्षेत्रात तैनात असल्याची माहिती उघड झाली होती. त्यानंतर आता अमेरिका, नॉर्वे, फ्रान्स यांच्या पाणबुड्यांचा युरोपिय सागरी क्षेत्रातील वावर वाढल्याचे सांगण्यात येते.
ब्रिटनजवळील सागरी क्षेत्राला या वर्षभरात नाटो सदस्य देशांच्या ८५ पाणबुड्यांनी भेट दिल्याची माहिती ब्रिटनच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिली. २०२१ साली हीच संख्या ४२ इतकी होती. या क्षेत्राला भेट देणाऱ्या पाणबुड्यांमध्ये अमेरिकेच्या प्रगत ‘व्हर्जिनिआ क्लास’ पाणबुड्यांसह फ्रान्स, नॉर्वे, जर्मनी या देशांच्या पाणबुड्यांचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या युरोपिय क्षेत्रातील हालचालीही वाढल्या असून या भागात रशियाकडून घातपाताची घटना घडू शकते, असा इशारा नाटो तसेच युरोपिय देशांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाटो देशांनी पाणबुड्यांचा वावर वाढविला असून त्यामुळे रशियन नौदलाच्या कारवायांना आळा बसल्याचा दावा ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केला.
सागरी क्षेत्रातील नौदलाचा वावर वाढवितानाच पोलंडमध्ये नाटोने नवा लष्करी सराव सुरू केला आहे. रशियाच्या कॅलिनिनग्रॅड तळाला जोडून असलेल्या सुवाल्की गॅप या भागात ‘तुमाक-२२’ सरावाला सुरुवात झाली आहे. यात नाटो सदस्य देशांचे दोन हजारांहून अधिक जवान सहभागी झाल्याचे पोलंड सरकारकडून सांगण्यात आले.
उत्तर युरोपमध्ये नाटोचा आण्विक सराव सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यापाठोपाठ आता नाटो सदस्य देशांच्या पाच विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप्स’सह युरोपच्या सागरी क्षेत्रात तैनात असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकी नौदलाने या वृत्ताला दुजोरा दिला. रशियाच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर नाटोने युरोपातील संरक्षण तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी सदस्य देशांमधील समन्वय वाढावा यासाठीही वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पाणबुड्यांचा वाढता वावर व नवा सराव त्याला दुजोरा देणारा ठरतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |