मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या धोकादायक व अदूरदर्शी धोरणांमुळे रशिया व अमेरिका थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र विभागाने दिला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने दोन देशांमधील संबंध बिघडण्यासाठी रशिया जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी अमेरिकाच वाढत्या तणावाला जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. रविवारी अमेरिकेतील रशियाचे राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनीही, रशियासंदर्भातील मानसिकतेचा विचार करता अमेरिका शीतयुद्धातून अजून बाहेर आली नसल्याची टीका केली होती.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी अमेरिकेविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. जगभरात रशियाविरोधी वातावरण तयार करून अधिकाधिक देशांना आपल्या गटात सामील होण्यास भाग पाडले जात आहे. त्याचवेळी रशियावर प्रचंड प्रमाणात निर्बंध टाकून रशियन अर्थव्यवस्था व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची राजवट कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून सुरू असलेल्या कारवायांना रशियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोन देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने तणाव असून परस्परांमधील सामंजस्यासह अनेक करार संपुष्टात आले आहेत.
अमेरिका व मित्रदेश यासाठी रशियावर ठपका ठेवत आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी, रशियाच्या हालचालींमुळे अमेरिका व रशियातील संबंध अस्थिर व अनिश्चित बनल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन सातत्याने रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही प्राईस यांनी केला होता. मात्र रशियाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेचे आरोप व दावे स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत.
‘रशियन परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील संपर्काच्या बाबतीत अमेरिकी प्रवक्ते धडधडीत खोटे बोलत आहेत. दोन्ही मंत्र्यांमधील शेवटची बोलणी जुलै महिन्याच्या अखेरीस पार पडली होती’, असे प्रत्युत्तर रशियाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी दिले. रशिया अमेरिकेबरोबरील संबंध स्थिर रहावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘अमेरिका तणाव अधिकाधिक भडकावा म्हणून हालचाली करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचे वर्चस्व कायम रहावे हीच अमेरिकेची इच्छा आहे. सुरक्षेच्या मुद्यावर हमी मिळावी यासाठी चर्चा करण्यासाठीही अमेरिका उत्सुक नाही. सध्याची समस्या अमेरिकेच्या या अनिच्छेमुळेच तयार झाली आहे’, असा ठपका परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी ठेवला. संघर्षाचा भडका वाढू नये यासाठी रशिया अजूनही अमेरिकेबरोबर विविध स्तरांवर चर्चा करण्यास तयार आहे, असा दावाही झाखारोव्हा यांनी केला.
दरम्यान, युक्रेनने रशियन भूभागावर केलेल्या माऱ्यात अमेरिकी बनावटीच्या ‘हार्म मिसाईल्स’चा वापर केल्याचे समोर आले आहे. रशियन दलांनी अमेरिकेची चार हार्म क्षेपणास्त्रे पाडल्याची माहिती दिली. रशिया-युक्रेन सीमेवर असलेल्या बेलगोरोद प्रांतात क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, असे रशियन सूत्रांनी सांगितले. युक्रेनला पुरविण्यात आलेली अमेरिकी शस्त्रे व इतर यंत्रणा रशियाचे लक्ष्य असेल, असा इशारा रशियाने यापूर्वीच दिला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |