मॉस्को/किव्ह/वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी 36 तासांसाठी युक्रेनचे युद्ध थांबविण्याची घोषणा केली होती. या संघर्षबंदीच्या काळातही युक्रेनच्या लष्कराने लुहान्स्क, डोनेस्क आणि झॅपोरिझियामध्ये आपल्या लष्करावर हल्ले चढविल्याचा आरोप रशियाने केला. तर रशियाची ही संघर्षबंदी फुटकळ असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी अमेरिकेने आपल्यासाठी जाहीर केलेल्या सुमारे तीन अब्ज डॉलर्सच्या नव्या लष्करी सहाय्याचे युक्रेनने स्वागत केले. अमेरिकेने आपल्या देशाला ‘पॉवरफुल पॅकेज’ दिल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाने जाहीर केलेली 36 तासांची संघर्षबंदी म्हणजे आपल्या लष्कराला ‘ऑक्सिजन’ मिळावा, यासाठी केलेली धडपड असल्याचा शेरा मारला आहे.
7 जानेवारी रोजी रशियाचे ‘ऑर्थोडॉक्स ख्रिस्तधर्मिय’ ख्रिसमस साजरा करतात. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ही 36 तासांची संघर्षबंदी जाहीर केली होती. पण युक्रेन तसेच पाश्चिमात्य देश ही संघर्षबंदी म्हणजे रशियाच्या डावपेचांचा भाग असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाने 25 डिसेंबर व नव्या वर्षाच्या सुरूवातीला युक्रेनमधील हॉस्पिटल्स, चर्च आणि बालगृहांवरही हल्ले चढविले होते, असा ठपका ठेवला. अशा परिस्थितीत रशिया सणासाठी संघर्षबंदी करणार नाही, त्यामागे आपल्या लष्कराला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न असावा, असा संशय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला.
अमेरिकेने युक्रेन तसेच रशियाच्या हल्ल्याची झळ बसलेल्या देशांसाठी सुमारे 3.75 अब्ज डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा केली आहे. हे सहाय्य युक्रेनच्या लष्कराला नवे बळ देईल, हे सर्वात पॉवरफुल पॅकेज आहे, असा दावा युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनच्या लष्कराला रणगाडे उद्ध्वस्त करू शकणारी चिलखती वाहने, अचूक मारा करणाऱ्या तोफा आणि तोफगोळ्यांची नितांत आवश्यकता होती. तसेच नवी रॉकेट्स व ड्रोन याचीही गरज युक्रेनी लष्कराला भासत आहे. हे सारे युक्रेनी लष्कराला पहिल्यांदाच मिळत असल्याचे सांगून झेलेन्स्की यांनी यामुळे युद्धाचे पारडे फिरेल, असे संकेत दिले आहेत.
तसेच रशियाने जाहीर केलेली संघर्षबंदी फुटकळ ठरते, असे सांगून युक्रेनी लष्कराने त्याचे पालन करण्यास स्पष्टपणे नकार दिला. लुहान्स्क, डोनेस्क आणि झॅपोरिझियामध्ये युक्रेनी लष्कराने हल्ले चढवून या संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनच्या लष्करानेही त्याला दुजोरा दिला. तर बाखमत येथे रशिया पुरस्कृत लष्करी गड वॅग्नर ग्रूपने आपल्या जवानांना घेतले आहे, अशी माहितीही युक्रेनी लष्कराने दिली. तर युक्रेनचे ड्रोन रशियाच्या क्रिमिआमधील सेव्हास्टोपोल शहरावर घिरट्या घालत असताना पाडण्यात आल्याची माहिती या शहराचे गव्हर्नर राझव्होझायेव्ह यांनी दिली. यामुळे युक्रेनचे लष्कर रशियात शिरून हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
रशियाने हल्ला चढविल्यानंतर, आपण केवळ आपल्या भूभागाचे रक्षण करू, रशियाच्या भूभागात हल्ले चढविणार नाही, असे युक्रेनने जाहीर केले होते. याच शर्तीवर युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली जात असून रशियन भूमीवर हल्ला चढविण्याची क्षमता असलेली शस्त्रे अमेरिकेने पुरविलेली नाहीत, अशी ग्वाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही दिली होती. पण आता अमेरिका युक्रेनला पुरवित असलेली शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य रशियाच्यावर अधिक तीव्रतेचे हल्ले चढविण्यासाठी पुरेसे असल्याचे दिसू लागले आहे.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |