24 फेब्रुवारीपासून रशिया युक्रेनवर तीन दिशांनी हल्ले चढविल

- युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

किव्ह/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनवर तीन दिशांनी नवा हल्ला करण्याची योजना आखली आहे, असा इशारा युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी दिला. 24 फेब्रुवारी, 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होत असतानाच रशिया नव्याने हल्ला चढवू शकतो, याकडे युक्रेनची सत्ताधारी राजवट वारंवार लक्ष वेधत आहे. या नव्या आक्रमणासाठी रशियाने जवळपास पाच लाख जवान तैनात करण्याची तयारी केल्याचा दावाही युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. युक्रेन हे दावे करीत असतानाच रशियाने डोन्बासमधील क्रॅमाटोर्स्क या शहरावर मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचे समोर आले आहे.

तीन दिशांनी

नव्या वर्षात रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचे मोठे हल्ले सुरू केले आहेत. दक्षिण युक्रेनमधील खेर्सन तसेच झॅपोरिझआमधील युक्रेनी लष्कराची आगेकूच रोखण्यातही रशियाला यश मिळाले आहे. रशियन फौजांच्या वाढत्या आक्रमकतेपुढे युक्रेनी फौजा अपयशी ठरल्या असून गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनला कोणतेही मोठे शहर अथवा भाग पुन्हा ताब्यात घेता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला रशियन फौजा डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहराच्या सीमेवर येऊन ठेपल्या असून गेल्या सात दिवसात दोन छोटी शहरे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी रशियाने डोन्बासमधील क्रॅमाटोर्स्क शहरावरही जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियाचे हे हल्ले नव्या मोठ्या आक्रमणाची तयारी असल्याचे दावे युक्रेनकडून करण्यात येत आहेत.

तीन दिशांनी

या महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. हे निमित्त साधून रशिया पुन्हा एकदा युक्रेनवर मोठे आक्रमण करील, असे युक्रेनकडून बजावण्यात आले. रशिया एकाच वेळी बेलारुस, क्रिमिआ व डोन्बासमधून युक्रेनवर जबर हल्ले करील, असा दावा युक्रेनच्या ‘नॅशनल सिक्युरिटी ॲण्ड डिफेन्स कौन्सिल’चे सचिव डॅनिलोव्ह यांनी केला. ‘मोठे हल्ले चढवून संघर्षाती तीव्रता अधिकाधिक वाढविण्याचा रशियाचा इरादा आहे. रशियाने मोठ्या प्रमाणावर लष्करी तुकड्या व शस्त्रांची जमवाजमव केली असून सरावही सुरू आहे. पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये काहीही होऊ शकते’, असे डॅनिलोव्ह यांनी बजावले.

तीन दिशांनी

रशिया-युक्रेन संघर्षात मोठी व घनघोर लढाई अजूनही व्हायची आहे. पण येत्या दोन ते तीन महिन्यात त्याला तोंड फुटेल, असा दावाही युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. युक्रेननेही आपल्या योजना तयार केल्या असल्याचे डॅनिलोव्ह यांनी सांगितले.युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनीही याला दुजोरा दिला असून रशियाने पाच लाख जवान तैनात करण्याची योजना आखल्याचा दावा केला.

दरम्यान, रशियाने गुरुवारी क्रॅमाटोर्स्क व खेर्सन भागात मोठे हल्ले चढविल्याचे समोर आले. क्रॅमाटोर्स्कमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. तर खेर्सन भागात तोफा व रॉकेटस्‌‍च्या सहाय्याने हल्ले चढविल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. रशियन फौजांनी डोन्बासमधील बाखमत शहराला वेढा घातल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, युक्रेनमधील लष्करी मोहिमेनंतर रशिया अधिक सशक्त व सामर्थ्यशाली झालेला असेल, असा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info