किव्ह/मॉस्को – येत्या दहा दिवसात रशिया युक्रेनवर नव्या हल्ल्यांसह मोठे आक्रमण करील, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. याअंतर्गत, संपूर्ण डोन्बास प्रांत ताब्यात घेऊन लुहान्स्क प्रांताच्या पश्चिमेकडील भागात तसेच दक्षिण युक्रेनमध्ये हल्ले करण्यात येतील, अशी माहिती युक्रेनच्या राजवटीला मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या आघाडीच्या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी, नव्या रशियन आक्रमणाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून पाश्चिमात्यांची नवी शस्त्रास्त्रे मिळण्यापूर्वीच हा हल्ला होईल, याकडे लक्ष वेधले आहे.
‘डोनेत्स्क प्रांतातील दक्षिण भागात रशियन लष्कराने मोठ्या प्रमाणात जमवाजमव व तैनाती केली आहे. मारिपोल व जवळच्या भागांमध्ये अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. डोन्बास क्षेत्र पूर्णपणे ताब्यात घेऊन लुहान्स्क प्रांताच्या पश्चिमेकडील भागात हल्ले करण्याची योजना आहे. रशियन लष्करातील आघाडीच्या प्रशिक्षित व अनुभवी तुकड्या नव्या आक्रमणाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता आहे. यात मरिन व हवाई तुकड्यांचा सहभाग असलेल्या ब्रिगेडस्चा समावेश असू शकतो’, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. पाश्चिमात्यांनी घोषित केलेले नवे शस्त्रसहाय्य युक्रेनमध्ये दाखल होण्यापूर्वीच रशिया प्रखर हल्ले चढवून आपले उद्दिष्ट गाठेल, असे ब्रिटनच्या ‘द फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
ब्रिटीश दैनिकात प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताला युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यातून दुजोरा मिळाला आहे. संरक्षणमंत्री रेझ्निकोव्ह यांनी रशिया लवकरच मोठे आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. फेब्रुवारी महिन्यातच रशियाचे हल्ले सुरू होणार असून तोपर्यंत युक्रेनकडे नवी शस्त्रास्त्रे आलेली नसतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र रशियन आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनकडे पुरेसा शस्त्रसाठा असल्याचा दावाही संरक्षणमंत्र्यांनी केला.
संरक्षणमंत्री रेझ्निकोव्ह रशियन आक्रमणाबाबत वक्तव्ये करीत असतानाच त्यांना पदावरून दूर करण्यात येणार असल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येऊ लागल्या आहेत. त्यांच्या जागी युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या प्रमुखांची नेमणूक होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. रेझ्निकोव्ह यांच्यावर भ्रष्टाचार अथवा घोटाळ्याचा थेट आरोप नसला तरी संरक्षण विभागातील काही जणांची अशा आरोपांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याची विस्तृत चौकशी सुरू झाली असून रेझ्निकोव्ह यांनाही काढण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
रशिया-युक्रेन शांतीप्रक्रियेत पाश्चिमात्यांनी खोडा घातला – इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचा आरोप
जेरुसलेम – रशिया व युक्रेनमधील शांतीप्रक्रियेत पाश्चिमात्य देशांनी खोडा घातल्याचा आरोप इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केला. इस्रायलच्या ‘चॅनेल 12’ला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत बेनेट यांनी पुढील काळातही रशिया-युक्रेन शांतीकरार शक्य नसल्याची जाणीव करून दिली. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना लक्ष्य न करण्याचे आश्वासन आपल्याला दिले होते असा दावाही त्यांनी केला.
‘इस्रायलच्या मध्यस्थीने गेल्या वर्षीच रशिया व युक्रेनमध्ये शांतीकरार जवळपास अंतिम टप्प्यात आला होता. दोन्ही देश यासाठी तडजोड करून संघर्षबंदीची तयारी दाखविली होती. मात्र पाश्चिमात्य देशांनी आक्रमक भूमिका घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर निर्णायक व जोरदार प्रहार करण्याचे धोरण पाश्चिमात्यांनी स्वीकारले होते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन याबाबत अधिकच आग्रही होते. पाश्चिमात्य देशांनीच रशिया-युक्रेन शांतीप्रक्रियेत खोडा घातला’, असा आरोप इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केला.
बेनेट यांच्या आरोपांमुळे रशिया या मुद्यावर सातत्याने मांडत असलेल्या भूमिकेला दुजोरा मिळाला असून युक्रेनी राजवटीसह पाश्चिमात्यांचे दावे खोटे पडले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |