संयुक्त राष्ट्रसंघ – जग निद्रितावस्थेमध्ये व्यापक युद्धाच्या खाईच्या दिशेने चालले आहे, अशी भीती आपल्याला सतावत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या युद्धासह जगभरात इतर ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींचा दाखला देऊन गुतेरस यांनी ही चिंता व्यक्त केली. जगासमोर एकाच वेळी अनेक आव्हाने खडी ठाकलेली आहेत आणि याचे पर्यावसन व्यापक युद्धात होऊ शकते, याची जाणीव गुतेरस यांनी करून दिली. २०२३ सालासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्राधान्यक्रमाबाबतची माहिती देत असताना, गुतेरस यांनी हा धोका अधोरेखित केला आहे.
दोन आठवड्यानंतर युक्रेनच्या युद्धाला वर्ष पूर्ण होईल. वर्षभर सुरू असलेल्या या युद्धात जबरदस्त हानी झालेली आहे. पण २४ फेब्रुवारीपासून रशिया युक्रेनवर अधिक तीव्रतेचे हल्ले चढविणार असून यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान होईल, असा दावा केला जातो. रशियाने फार आधीपासून याबाबतचे इशारे दिले होते. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याची तीव्रत वाढल्यानंतर पाश्चिमात्य देश युक्रेनला सहाय्य पुरवित असताना या युद्धात खेचले जातील असा इशारा सामरिक विश्लेषक देत आहेत. रशियन सैन्य युक्रेनी लष्कराबरोबर लढत नाही, तर नाटोच्या लष्कराशीच रशिया युक्रेनमध्ये लढत असल्याचा ठपका रशियाने ठेवला होता. तसेच नाटोने युक्रेनी लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवून रशियाविरोधातील युद्धात उडी घेतल्याचा आरोप रशियाने केला. याची किंमत मोजावी लागेल, असे रशियाने अमेरिकेसहीत नाटोच्या इतर सदस्य देशांनाही बजावले होते.
थेट उल्लेख केला नसला, तरी या घडामोडींचा अस्पष्टसा संदर्भ देऊन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी ‘व्यापक युद्धाचा’ इशारा दिला. जग निद्रितावस्थेत व्यापक युद्धाच्या खाईच्या दिशेने चाललेले आहे, अशी चिंता आपल्याला सतावत असल्याचे सांगून गुतेरस यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. रशिया व युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होणे अत्यावश्यक आहे, पण सध्या तरी शांती प्रस्थापित होण्याची शक्यता धूसर बनत चालली आहे, या वास्तवाचीही गुतेरस यांनी जाणीव करून दिली.
केवळ रशिया व युक्रेनमधील युद्धच नाही तर इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वादाची तीव्रता वाढत चालली आहे. अफगाणिस्तानातील मुली आणिण महिलांचे अधिकार पायदळी तुडविले जात आहेत. या देशात सातत्याने दहशतवादी हल्ले सुरू आहेत. म्यानमारमध्ये हिंसाचाराची नवी लाट उसळली आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी हैतीला वेठीस धरले असून त्यांचेच राज्य या देशावर आहे. आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रातील सुरक्षाविषयक स्थिती गंभीर बनलेली आहे, असे सांगून जगासमोर खड्या ठाकलेल्या भयावह संकटांचा पाढाच गुतेरस यांनी वाचला.
अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघ शांततेचा पुरस्कार करून नवा अजेंडा राबविणार असल्याचा दावा गुतेरस यांनी केला. महासचिवांकडून अशा स्वरुपाचे दावे केले जात असले तरी शांतता प्रस्थापित करण्यात व युद्ध रोखण्यात संयुक्त राष्ट्रसंघाला यश मिळालेले नाही, ही बाब विश्लेषक सातत्याने लक्षात आणून देत आहेत. भारतासारखा देश तर संयुक्त राष्ट्रसंघाची रचना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातली असून ही जूनाट रचना बदलण्याची गरज असल्याचे वारंवार बजावत आहेत. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ प्रभावहीन बनल्याचा ठपका भारताने ठेवला आहे व त्याला इतर देशांकडूनही दुजोरा मिळत आहे. त्यामुळे व्यापक युद्धाची शक्यता वर्तवून व त्यावर चिंता व्यक्त करून देखील शांततेचा पुरस्कार करणारा अजेंडा राबविण्याची क्षमता राष्ट्रसंघाकडे राहिलेली नसल्याचे समोर येत आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी व्यक्त केलेली चिंता अधिकच भयावह बाब ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |