मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील निर्णायक ठरणाऱ्या बाखमत शहरावरील रशियन लष्कराचे हल्ले अधिकाधिक प्रखर होत असल्याचा दावा युक्रेनी लष्कराने केला आहे. सोमवारी रशियन लष्कराने बाखमतवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब्स तसेच रॉकेट्सचा मारा केला. रशियन सैन्यदल हळुहळू पुढे सरकत असून युक्रेनी लष्कराकडील शस्त्रसाठा व रसद संपत आल्याची माहिती पाश्चिमात्य माध्यमे व यंत्रणांनी दिली. दरम्यान, रशियातील खाजगी लष्करी कंपनी असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’ने गेल्या 48 तासात बाखमतनजिकच्या दुसऱ्या भागावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत रशियाकडून युक्रेनवर अधिक मोठे व तीव्र हल्ले होण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येत होती. गेल्या आठवड्यापासून रशियन हल्ल्यांची वाढलेली तीव्रता याला दुजोरा देणारी ठरली आहे. शनिवारी तसेच रविवारी रशियन लष्कराने पूर्व युक्रेनमधील विविध शहरांवर क्षेपणास्त्रांसह तोफा, रॉकेटस् व ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात मारा केला होता. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनी लष्कराचे 250हून अधिक जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती.
पूर्व युक्रेनमधील सर्वच आघाड्यांवरील हल्ले प्रखर झाले असले तरी मुख्य लक्ष्य बाखमतच असल्याकडे युक्रेनी लष्कर व पाश्चिमात्य यंत्रणा लक्ष वेधत आहेत. डोनेत्स्क प्रांतात मोक्याच्या जागी असलेले बाखमत हे शहर पूर्ण प्रांतावरील ताब्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. बाखमत हे शहर रशियासाठी ‘टॅक्टिकल व्हिक्टरी’ ठरु शकते, असा दावा पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांकडून करण्यात येतो. बाखमतवरील ताब्यानंतर रशिया डोनेत्स्कमधील क्रॅमाटोर्स्क व स्लोव्हिआन्स्क या शहरांवर मोठे हल्ले चढवू शकतात. त्यामुळे या शहरांसह डोनेत्स्क प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाखमतचा ताबा निर्णायक ठरतो. त्यामुळे गेल्या वर्षापासून रशियन फौजा सातत्याने हे शहर ताब्यात घेण्यासाठी हल्ले करीत आहेत.
गेल्या 48 तासांमध्ये रशियाने बाखमतमध्ये चांगली आगेकूच करण्यात यश मिळविले आहे. ‘वॅग्नर ग्रुप’च्या पथकांनी बाखमतच्या सीमेवरील क्रास्नाया गोरा तसेच बुडनोव्हका हे दोन भाग ताब्यात घेतले आहेत. रशियन लष्कराच्या तुकड्यांनी बाखमतला सर्व बाजूंनी वेढा घालण्यात यश मिळविल्याचा दावाही रशियाच्या संरक्षण विभागाने केला.
दरम्यान, रशियाच्या चेचेन प्रांताचे प्रमुख रमजान कादिरोव्ह यांनी, रशिया दक्षिण युक्रेनमधील ओडेसा तसेच ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह या प्रांतांवरही ताबा मिळवेल, असे वक्तव्य केले आहे. रशियाच्या सुरक्षेसाठी हे भाग ताब्यात असणे महत्त्वाचे ठरते, असे कादिरोव्ह यांनी सांगितले. त्याचवेळी रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेली मोहीम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |