अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या युक्रेन भेटीत ५० कोटी डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा

- रशिया अपयशी ठरल्याचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा दावा

किव्ह/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे चार दिवस राहिले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला अनपेक्षितरित्या भेट दिली. सोमवारी पोलंडमध्ये उतरून रेल्वेमार्गाने राष्ट्राध्यक्ष बायडेन युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले. बायडेन युक्रेनमध्ये दाखल होण्यापूर्वी काही तास आधी या भेटीची कल्पना रशियन राजवटीला देण्यात आली होती. यावेळी रशियाकडून बायडेन यांच्या सुरक्षेची हमी घेण्यात आली होती, असा दावा रशियाच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे. अवघ्या काही तासांच्या या भेटीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनला ५० कोटी डॉलर्सचे नवे शस्त्रसहाय्य जाहीर केले. त्याचबरोबर एक वर्षानंतरही युक्रेन ठामपणे उभा असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी छेडलेले युद्ध अपयशी ठरल्याचा दावाही केला.

५० कोटी

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला होता. त्यानंतर युक्रेनला समर्थन देणाऱ्या तसेच शस्त्रसहाय्य पुरविणाऱ्या अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांनी युक्रेनला भेट दिली होती. यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, रोमानिया यासह प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा सहभाग आहे. मात्र युक्रेनला सर्वाधिक सहाय्य पुरविणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला भेट दिली नव्हती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या अमेरिकी दौऱ्यात बायडेन यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र त्यानंतरही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची भेट अनिश्चित असल्याचे बायडेन प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

५० कोटी

या पार्श्वभूमीवर सोमवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनची राजधानी किव्हला दिलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. बायडेन यांनी आपल्या धावत्या व अघोषित दौऱ्यादरम्यान युक्रेनमधील चर्चसह राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाला भेट दिली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह काही मिनिटांचा ‘वॉक’ घेतल्याची माहितीही अमेरिकी सूत्रांनी दिली. दोन राष्ट्रप्रमुखांमधील चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून स्वतंत्र निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात युक्रेनला ५० कोटी डॉलर्सच्या नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा करण्यात आली.

५० कोटी

अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या या शस्त्रसहाय्यात हॉवित्झर तोफा, जॅवेलिन मिसाईल्स, रडार्स व आर्टिलरी सिस्टिम्ससाठी लागणारी शस्त्रसामुग्री यांचा समावेश आहे. चर्चेदरम्यान झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची मागणी केल्याचेही सांगण्यात येते. मात्र बायडेन यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही, असा दावा करण्यात आला आहे. पण युक्रेनच्या संरक्षणदलांची प्रशंसा करून अमेरिका अखेरपर्यंत युक्रेनच्या पाठिशी राहिल, अशी ग्वाही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिली. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या युद्धाबाबतच्या योजना अपयशी ठरल्याचा दावाही केला.

युक्रेनसह युरोपिय देशांनी बायडेन यांच्या भेटीचे स्वागत केले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भेटीतून युक्रेनसाठी असलेली वचनबद्धता दिसून आल्याचे पोलंडकडून सांगण्यात आले. तर बायडेन यांच्या भेटीमुळे युक्रेनी जवानांचे मनोधैर्य वाढेल, असा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. बायडेन व झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बैठकीत पुढील संघर्षाशी निगडीत मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती युक्रेनी सूत्रांनी दिली. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या संसद सदस्यांनी बायडेन यांच्या युक्रेन भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, युक्रेन पुढील काही दिवसांमध्ये ‘न्यूक्लिअर फॉल्स फ्लॅग अटॅक’ घडविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण विभागाने केला. एका युरोपिय देशातून युक्रेनमध्ये किरणोत्सर्गी पदार्थांचा साठा दाखल झाला असल्याचेही रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून आयोजित बैठकीपूर्वी मोठा हल्ला घडविण्याची तयारी झाल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. यापूर्वी झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावर युक्रेनकडून होणारे हल्ले उधळल्याची माहिती रशियाने दिली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info