मॉस्को/किव्ह – रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी शनिवारी डोनेत्स्क प्रांतातील लष्कराच्या कमांड सेंटरला भेट दिली. या भेटीत त्यांनी रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्व युक्रेनमधील कारवाईसंदर्भात माहिती घेतल्याचे सांगण्यात येते. येत्या काही दिवसात बाखमत रशियाच्या ताब्यात जाण्याचे संकेत मिळाले असून त्यानंतर रशिया डोन्बाससाठीची मोहीम अधिक व्यापक करेल, असे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. दरम्यान, रशियाने काही दिवसांपूर्वी दीड टन वजनाच्या प्रगत ‘ग्लायडिंग बॉम्ब’चा वापर केल्याचा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केला आहे.
रशियन फौजांनी नवीन वर्षात युक्रेनच्या संपूर्ण आघाडीवर सातत्याने हल्ले करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हपासून ते दक्षिण युक्रेनमधील खेर्सनपर्यंत प्रत्येक आघाडीवर दररोज छोटेमोठे हल्ले सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने युक्रेनचा बचाव मोडून काढत, लष्करी क्षमता लक्ष्य करून आगेकूच चालू असल्याचे संरक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या दाव्यांवरून स्पष्ट होते.
शनिवारी रशियन फौजांनी खार्किव्हसह डोनेत्स्क, झॅपोरिझिआ व खेर्सन या सर्व आघाड्यांवर मारा केला. डोनेत्स्क प्रांतात रशियन संरक्षणदलाच्या ‘सदर्न ग्रुप ऑफ फोर्सेस’च्या तुकड्यांनी केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाल्याचे समोर आले आहे. डोनेत्स्क भागात केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे 200हून अधिक जवान ठार झाले आहेत. या कारवाईत तोफा व रणगाड्यांसह हवाईहल्ल्यांचा वापर झाल्याची माहिती संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी दिली. तर झॅपोरिझिआ प्रांतातील मेरिव्हकामध्ये केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या ‘अझॉव्ह रेजिमेंट’चे कमांड पोस्टस् उडवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
खेर्सन प्रांतामध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये 30हून अधिक युक्रेनी जवान ठार झाले आहेत. या हल्ल्यात युक्रेनी लष्करा काही सशस्त्र वाहने व हॉवित्झर्सही उद्ध्वस्त केल्याचे संरक्षण विभागाने स्पष्ट केले. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हमध्ये केलेल्या कारवाईत युक्रेनी लष्कराच्या ड्रोन विभागाचे केंद्र नष्ट केल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. दक्षिण युक्रेनमध्ये रशिया नव्या आक्रमक कारवाईच्या तयारीत असून युक्रेनी लष्कराच्या बचावफळ्यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत असल्याचे युक्रेनी लष्कर व परदेशी माध्यमांकडून नमूद करण्यात आले. दरम्यान, रशियाने तब्बल दीड टन वजनाच्या ‘ग्लायडिंग बॉम्ब’चा वापर केल्याचा दावा युक्रेनी लष्कराकडून करण्यात आला.
‘युपीएबी-1500बी’ असे या बॉम्बचे नाव असून चेर्निहिव्ह भागात केलेल्या हल्ल्यात त्याचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. या बॉम्बमध्ये ‘सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टिम’सह एक हजार किलोहून अधिक वजन असलेल्या ‘वॉरहेड’चा उपयोग करण्यात आला आहे. लक्ष्यापासून 40 किलोमीटर दूरवरून या बॉम्बचा वापर करण्यात येतो, असे युक्रेनी लष्कराने आपल्या दाव्यात म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने पहिल्यांदाच या ग्लायडिंग बॉम्बचा वापर केला असून पुढील काळात वापर वाढू शकतो, अशी चिंता युक्रेनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |