ब्रुसेल्स/मॉस्को – दुसऱ्या महायुद्धानंतर लष्करी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेला फिनलँड मंगळवारी नाटोचा ३१वा सदस्य देश म्हणून सामील झाला. ब्रुसेल्समध्ये फिनलँडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सदस्यत्वाची अधिकृत कागदपत्रे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांना सुपूर्द केली. यावेळी नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्गही उपस्थित होते. फिनलँडच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गंभीर परिणामांचा इशारा दिला असून उत्तर व पश्चिम सीमेवरील लष्करी क्षमता अधिक वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
‘गेली ७५ वर्षे नाटोने आपल्या सदस्य देशांचे सुरक्षा कवच बनून संरक्षण केले आहे. युरोपला पुन्हा युद्धाने वेढले असून याच काळात फिनलँडने नाटोचे सदस्यत्व स्वीकारून जगातील सर्वात यशस्वी आघाडीचा भाग बनण्याचा निर्णय घेतला’, अशा शब्दात नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी फिनलँडच्या निर्णयाचे स्वागत केले. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष सोली निनित्सो यांनी, लष्करी अलिप्ततावादाचा काळ संपला आहे या शब्दात नाटोतील प्रवेशाचे समर्थन केले. त्याचवेळी हे सदस्यत्व कोणत्याही देशाच्या विरोधात नसल्याचा खुलासाही केला.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व नाटोने युरोपातील लष्करी क्षमता वाढविण्याच्या हालचालींना वेग दिला होता. याअंतर्गत युरोपमधील फिनलँड व स्वीडन या देशांवर नाटोत सामील होण्यासाठी दबाव टाकण्यात आला. रशियन आक्रमकतेचे कारण पुढे करून दोन्ही देशांच्या राजवटींनी नाटोतील समावेशाला मान्यता दिली. यापैकी फिनलँड मंगळवारी अधिकृतरित्या नाटोचा सदस्य म्हणून सामील झाला. मात्र स्वीडनचे सदस्यत्व लांबणीवर पडण्याचे संकेत मिळाले आहेत.
फिनलँड व स्वीडनने नाटोतील समावेशाला मान्यता दिल्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी खरमरीत इशारा दिला होता. रशियन राजवटीतील इतर नेत्यांनीही यापुढे हे दोन्ही देश रशियन क्षेपणास्त्रांचे लक्ष्य ठरतील, असे बजावले होते. मात्र त्यानंतरही दोन्ही देशांचा नाटोतील प्रवेश निश्चित झाल्याने रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी रशियन लष्कर पुढील काळात आवश्यक पावले उचलून नाटोच्या विस्ताराला प्रत्युत्तर देईल, असे म्हटले आहे. रशियाच्या उत्तर व पश्चिम सीमेवर लष्करी तैनाती वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही रशिया फिनलँडच्या नाटोतील समावेशाविरोधात आक्रमक पावले उचलेल, असा इशारा दिला. फिनलँडचा नाटोतील प्रवेश हा रशियन हितसंबंध व सुरक्षेला धोका असल्याकडेही पेस्कोव्ह यांनी लक्ष वेधले.
नाटोने रशियाच्या दिशेने अजून एक पाऊल उचलून आपले धोरण स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र विभागाने दिली. फिनलँडचा नाटोतील प्रवेश रशिया व फिनलँडमधील राजनैतिक संबंधांना धक्का पोहोचविणारा ठरेल, असेही रशियन प्रवक्त्यांनी बजावले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |